तरी राष्ट्रवादीत सर्व अलबेल असल्याचा दावा
मुंबई (रिपोर्टर) राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर एकीकडे टांगती तलवार असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या सोशल मिडिया हँडलवरून घड्याळ चिन्ह असलेले वॉलपेपर हटवल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळाले असले तरी राष्ट्रवादीत सर्व अलबेल असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा गट फुटून तो भाजपाशी सलगी करणार असल्याचे दावे मोठ्या प्रमाणावर केले
जात असल्याने राष्ट्रवादीत खदखद आणि अस्वस्थता प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे.
याबाबत अधिक असे की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपासोबत सलगी करणार आहेत, त्यांच्या सोबत पक्षातील 40 आमदार असल्याचा दावा करणारे वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशीत केल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अजित पवारांच्या बंडाबाबतच्या चर्चेला हवा मिळाली. अजित पवार हे भाजपाला मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर टांगती तलवार असताना भाजप सत्तेत राहण्याहेतू राष्ट्रवादीत फोडाफोडीचे राजकारण करत आहे. अजित पवार यांनी आज आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून पक्षाचे चिन्ह असलेला वॉलपेपर काढून टाकल्याने या चर्चेला अधिक बळ मिळत आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीत सर्व अलबेल असल्याचा दावा पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे.
धनंजय मुंडे म्हणाले,
राष्ट्रवादीत सगळं ऑल इज वेल…
प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार धनंजय मुंडेंना ‘राष्ट्रवादीत ऑल इज वेल आहे का?’ असा प्रश्न केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना ‘परफेक्टली वेल’ असं धनंजय मुंडे म्हणाले. मतदारसंघातील कामासाठी मी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना भेटल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केलं. धनंजय मुंडे हे मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं. कामांना स्थगिती देण्यात आल्या आहेत, त्याबाबत अजितदादांचं पत्र घेण्यासाठी मी विधानभवनात आलो होतो असेही मुंडे म्हणाले.
मी काय सांगतो ते महत्त्वाचं, इतरांना फाटे फोडण्याचा अधिकार नाही, दादांच्या चर्चेवर काकांनी खडसावलं
अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही चर्चा केवळ तुमच्या मनात आहे, आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चांना अजिबात महत्त्व नाही, असं शरद पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप यांच्या जवळीच्या चर्चा केवळ तुमच्या मनात आहेत, आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चांना अजिबात महत्व नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय चर्चांवर भाष्य केलं. ते पुण्यात बोलत होते. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या राजकीय चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार जी भूमिका घेतील ती मान्य असल्याचं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं.
शरद पवार म्हणाले, अजित पवारांबाबत जी चर्चा सुरु आहे, ती केवळ माध्यमांच्या मनात आहेत, आमच्या कुणाच्याही मनात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व सहकारी पक्षाला शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. अजित पवारांनी कोणतीही बैठक बोलावलेली नाही. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे सध्या त्यांच्या भागात आहेत. दुसरे नेते अजित पवार हे बाकीच्यांना मार्गदर्शन करत आहेत. मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही.