माफियांवर कठोर कारवाई करा; परिसरातील शेतकर्यांची मागणी
बीड (रिपोर्टर): महसुल आणि पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होतो. गेवराई तालुक्यातील भाटसांगवी शिवार परिसरातून वााहणार्या नदीपात्रातून रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याने या वाळू उपशामुळे त्या भागातील शेतकर्यांच्या शेतीला धोका निर्माण होतो. या प्रकरणाकडे महसुल प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे या संदर्भात वेळोवेळी पिंपळनेर पोलीसांना सागितल्यानंतरही केवळ हप्त्यापोटी पोलीसांकडून दोषींवर कारवाई केली जात नसल्याची ओरड या भागातील शेतकर्यांनी केली आहे.
भाटसांगवी शिवार इरगावला जाणार्या रस्त्यालगत असलेल्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो. या वाळूउपशामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे निर्माण होतात तर नदीपात्राच्या कडेला केलेल्या वाळू उपशातून त्या परिसरातील शेतकर्यांच्या शेतीला धोका निर्माण होतो. पुर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वाळु उपशामुळे पडलेले खड्डे आणि नदीच्या तिरावरील खोदकामामुळे शेतीची माती ढिसूळ होते. त्यामुळे ती माती पुरात वाहून जावून पाणी शेतात घुसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकरी वाळू माफियांनी वाळू उपसा करू नये यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असतात. परंतू महसुल विभाग आणि पोलीस प्रशासन सर्रासपणे हप्ते घेवून वाळू उपसा करणार्यांना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र समोर येत आहे. भाटसांगवी शिवार इरगाव परिसरात होत असलेल्या वाळू उपसा तात्काळ बंद करून वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रात्री 12 वाजल्याच्या नंतर या ठिकाणी दोन जेसीबी सह हायवा ट्रॅक्टर घटनास्थळावर येतात. त्या ठिकाणी रात्रभर वाळू उपसा करून वाळू माफिये स्वत:चे उखळ पांढरे करून घेतात. या गंभीर प्रकरणाकडे पिंपळनेर पोलीसांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.