बीड, (रिपोर्टर):- दिवसभर पेट्रोलपंपावर पेट्रोल,डिझेलची झालेल्या विक्रीतून आलेला पैशाचा गल्ला घेवुन पेट्रोलपंप मालक व नौकर स्कुटीवरून बीडकडे येत असतांना त्यांच्या स्कुटीचा पाठलाग करत अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांच्या स्कुटीला दुचाकी आडवी लावुन चाकुचा धाक दाखवत त्यांच्याजवळील नगदी रोख रक्कम 2 लाख पन्नास हजार 860 रूपये पळवुन नेल्याची घटना काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बीड शहराजवळील पांगरबावडी जवळ घडली. सायंकाळच्या दरम्यान वर्दळीच्या रोडवर वाटमारीसारखा गंभीर गुन्हा घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, बीड शहरातील पेठ बीड भागात राहणारे राजेंद्र डिगांबर सोनवणे हे आपल्या मालकासह वरद पेट्रोलपंपावर दिवसभरात जमा झालेली रक्कम 2 लाख पन्नास हजार 860 रूपये स्कुटीच्या डिक्कीत टाकुन सायंकाळच्या दरम्यान ते बीड शहराकडे येत होते. सोनवणे व त्यांचा मालक रस्त्याने येत असताना पाठीमागुन एका मोटारसायकलवर अज्ञात तिघे पाठलाग करत सव्वासात वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कुटी पांगरबावडी शिवारात आली असता पाठीमागुन पाठलाग करणार्या अज्ञात तिघांनी स्कुटीला मोटारसायकल आडवी लावली त्यातील एखाने आपल्याजवळील धारदार चाकु समोर करत फिर्यादीसह त्याच्या मालकाला धाक दाखवुन डिक्कीमधील रक्कम चोरून नेली. सदरची घटना ही सायंकाळच्या दरम्यान घडली. या वाटमारीने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी राजेंद्र सोनवणे यांनी बीड ग्रामिण पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा रजि.नंबर 97/2023 कलम 392, 341, 34 भादंवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे.