पुढील अडीच महिन्यांसाठी प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून चांगला पाऊस पडत असल्याने नव्वद टक्के धरणे भरलेली होती. मात्र यावर्षी उन्हाची तीव्रता अधिकच वाढल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होऊ लागलीय. सध्या तलावांमध्ये 40 टक्केपर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे निर्देश प्रशासनाने दिलेले आहे. जिल्ह्यातील 641 गावात पाण्याची टंचाई निर्माण होणार असून त्यासाठी 3 कोटी रुपयांचा प्रतिआराखडा तयार करण्यात आला. पुढील अडीच महिन्यांसाठी पाणीटंचाईबाबत प्रशासन दक्ष आहे.
तीन वर्षांपासून मराठवाड्यामध्ये धो-धो पाऊस पडत आहे. यामुळे जवळपास सर्वच धरणे भरली होती. यंदाही चांगली परिस्थिती होती. मात्र उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होऊ लागले. जी तलावं पुर्णत: भरलेली होती ते तलाव 35 ते 40 टक्क्यांपर्यंत आले आहेत. काही तलावात तर 20 टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. आगामी काळाचा विचार करता जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार आतापासूनच दक्ष आहेत. तलावातील पाण्याच्या वापराबाबत काही निर्देश देण्यात आले. ज्या तलावात 20 टक्केपर्यंत पाणी आहे त्या तलावातील पाणी राखून ठेवण्याचे आदेश आहेत. पाऊस चांगला पडूनही यंदा 641 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यासाठी शासनाने 3 कोटी रुपयांचा प्रतिआराखडा तयार केला आहे. पाऊस पडेपर्यंत प्रशासन पाण्याच्या बाबतीत सतर्क आहे. येणार्या दोन ते अडीच महिन्याच्या पाण्याच्या बाबतीत प्रशासनाने नियोजन केले आहे. ज्या ठिकाणी टँकरची गरज भासेल तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जाणार तर काही ठिकाणी विहीर आणि बोअरचे अधिग्रहण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.