आघाडीचा 15 जागेवर दणदणीत विजयी
बीड (रिपोर्टर) बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या तीस वर्षांपासून पाल ठोकून बसलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना जबरदस्त धक्का देत त्यांचे पुतणे आ. संदीप क्षीरसागर यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत धूळ चारली. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत आ. संदीप क्षीरसागरसह आघाडीला तब्बल 15 जागांवर दणदणीत विजय मिळवता आला. तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना केवळ व्यापारी आणि हमाल मापाडी मतदारसंघातल्या तीन जागा कशाबशा स्वत:कडे ठेवण्यात यश मिळवता आलं. थोरल्या क्षीरसागरांचा हा पराभव आणि बाजार समितीतून उठलेला पाल त्यांच्या भविष्यातील राजकारणाला सर्वात मोठे गतीरोधक मानले जातआहे. आ. संदीप क्षीरसागरांनी विरोधकांची मोट बांधून मिळवलेला हा विजय महत्वाचा मानला जात असून विजयानंतर आघाडीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष साजरा केला.
गेल्या तीस वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा दबदबा होता. यावर्षी त्यांचे पुतणे आ. संदीप क्षीरसागर यांनी विरोधकांची मोट बांधली. भाजपाचे राजेंद्र मस्के, उद्धव सेनेचे अनिल जगताप, शिंदे सेनेचे कुंडलिक खांडे, शिवसंग्राम आणि शेतकरी संघटनांना सोबत घेऊन थोरल्या क्षीरसागरांविरोधात कडवे आव्हान उभे केले होते. जयदत्त क्षीरसागरांच्या ताब्यातील बाजार समिती त्यांच्या हातून जाऊच शकत नाही, हा क्षीरसागरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आज फोल ठरला. काल मोठ्या उत्साहात मतदान झाल्यानंतर आज सकाळी बीड शहरातल्या जुन्या मोंढ्यात मतमोजणीला सुरुवात झाली. अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी सुरू असताना सकाळी साडेदहा पावणे अकराच्या दरम्यान आ. संदीप क्षीरसागर गटाला शुभ शकून आला आणि ग्रामपंचायत मतदार संघातल्या चार जागा निवडून आल्या. त्यापाठोपाठ सोसायटी मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासूनच आघाडीतील उमेदवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या उमेदवारांवर वरचढ ठरत होते. सरशेवटी त्या मतदारसंघातही सर्व जागा आघाडीच्या निवडून आल्या. 15 जागांवर संदीप क्षीरसागरांसह आघाडीचा दणदणीत विजय झाला. तर 30 वर्षांची सत्ता असलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना केवळ 3 जागांवर कसाबसा जय मिळवता आला. संदीप क्षीरसागर गटाचा विजय झाल्यानंतर गुलालाच्या उधळणीसह फटाक्यांची आतीषबाजी आणि समर्थकांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले. समर्थकांचा जल्लोष प्रचंड दिसून आला. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना पुतणे आ. क्षीरसागरांकडून हा जबरदस्त धक्का मानला जातोय.