धस की पवार चाचपणी सुरू
बीड (रिपोर्टर) सुप्रीम कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला जीवदान दिल्यानंतर आता शिंदे-फडणवीसांचे सरकार मंत्रीमंडळ विस्ताराच्या विचाराधीन असून या विस्तारात बीड जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंत्रिपद देताना बाजार समिती निवडणुकांसह शह-काटशहाच्या राजकारणाला विचारात घेत फडणवीस मंत्रीपद देतील, अशी चर्चा होत असतानाच कर्नाटक निवडणुकीचा निकाल पाहता भाजप आपल्य नेत्यांना नाराज न करता निर्णय घेईल, असे सुत्रांचे सांगणे असल्याने मंत्रिपदाच्या शक्यतेत विद्यमान आमदारांचे नाव चर्चेत तर आहेच याउलट भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाबाबतही शक्यता वर्तविली जात आहे.
बीड जिल्ह्यात सध्या विधानसभेचे दोन आमदार आणि विधान परिषदेचा एक आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे. यामध्ये सातत्याने चर्चेत राहिलेले आष्टी-पाटोद्याचे आमदार सुरेश धस यांच्याकडे मंत्रीपद जाईल की, देवेंद्र फडणवीसांचे खंदेसमर्थक म्हणून ओळखले जाणारे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांना मंत्री बनवून ताकत दिली जाईल यावर चर्चा होत असतानाच भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे बीड जिल्ह्याला मंत्रीपदापासून मुकावे तर लागणार नाही, अशीही चर्चा एकंदरीत होत आहे. परंतु कर्नाटक विधानसभेचा लागलेला निकाल त्यात भाजपाचा झालेला दारुण पराभव पाहता भाजप महाराष्ट्रामध्ये पक्षांतर्गत निर्णय घेताना ताकही फूंकून पिऊ इच्छित असल्याने बीडच्या मंत्रीपदाबाबत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंहे यांना विश्वासात घेऊन मंत्रीपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून या विस्तारात आ. सुरेश धस यांना सामील करून घेणार की, लक्ष्मण पवार यांची लॉटरी लागणार? हे आजमितीला सांगणे कठीण असले तरी विस्ताराच्या कार्यप्रणालीत पंकजा मुंडेंना प्रत्यक्ष सहभागी करून बीडच्या मंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.