‘वैद्यनाथ’ बिनविरोध होणार; ताईंचे 11 तर भाऊंचे 10 संचालक होणार
बीड (रिपोर्टर) शेतकर्यांचे हित जोपासण्या हेतू लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे व स्व. पंडितअण्णा मुंडे यांनी वैद्यनाथ कारखाना उभा केला. या कारखान्याच्या माध्यमातून परळीसह परिसरातील शेतकर्यांना त्याचा मोठा फायदा झाला. मात्र गेल्या काही वर्षांपासून कारखाना हा बंद चालू होत होता. आता केवळ शेतकर्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून मुंडे बंधू-भगिनी एकत्रित येत असून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान पंकजा मुंडेंचे अकरा सदस्य तर धनंजय मुंडेंचे दहा सदस्य अशी तडजोड होत हा कारखाना पुन्हा एकदा राज्यात एक नंबरला आणण्याचा प्रयत्न मुंडे बंधू-भगिनींकडून होणार असल्याचे सांगण्यात येते.
वैदद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख काल होती. आता उमेदवारी अर्जांची छानणी होत आहे. तत्पूर्वी शेतकर्यांचे हित समोर ठेवून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात कारखान्याबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येते. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर पंकजा मुंडे यांचे 11 संचालक तर धनंजय मुंडे यांचे 10 संचालक असणार आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे आणि स्व. पंडितअण्णा मुंडे या दोघांनी हा कारखाना उभारून परळीसह त्या भागातील शेतकर्यांना मोठा आधार दिला होता. वैद्यनाथ कारखाना हा स्व. मुंडेंच्या काळात राज्यात नव्हे तर देशात एक नंबर होता. सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणूनही वैद्यनाथकडे पाहिले जात होते. मात्र मध्यंतरीच्या काळात कारखाना कर्जबाजारी झाला. त्यामुळे बंद-चालू होत असलेल्या या कारखान्याची झळ शेतकर्यांनाही लागू लागली. मात्र आता स्व. पंडितअण्णा आणि स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या या कारखान्यावर मुंडे बंधू-भगिनी लक्ष ठेवून असणार आहेत. त्यासाठीच केवळ शेतकर्यांचे हित पाहून दोघे एकत्रित येत असून कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे सांगण्यात येते.