मुंबर्स (रिपोर्टर) आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्याचा निश्चय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केल्याचे दिसते. भाजपच्या सहयोगी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात ठाकरे गटाने शड्डू ठोकला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या मुलूखमैदानी तोफ सुषमा अंधारे यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली आहेत. त्यामुळे भाजपशी जवळीक असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि सुषमा अंधारे यांच्यात थेट लढाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर महत्त्वाचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि अमरावती मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (पान 7 वर)
गटाचे संपूर्ण लक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही मतदारसंघातून लोकसभेवर आपला उमेदवार निवडून आणण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांवर मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा विधान परिषदेवरील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विरुद्ध एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमरावतीची जागा ही राखीव आहे आणि मी त्या प्रवर्गात बसत नसल्याने या चर्चा निरर्थक आहेत. माझ्यापर्यंत लोकसभा लढण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाल्याची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.