Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमबीडची एलसीबी हरकतमध्ये, मोटारसायकल चोरांची धरपकड; सहा संशयित ताब्यात; २५ पेक्षा जास्त...

बीडची एलसीबी हरकतमध्ये, मोटारसायकल चोरांची धरपकड; सहा संशयित ताब्यात; २५ पेक्षा जास्त मोटारसायकल हस्तगत

बीड शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात छापासत्र
बीड (रिपोर्टर):- शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारी आणि ओरड होत असतानाच बीडची गुन्हे अन्वेषण शाखा हरकतमध्ये आली. गुप्त माहितीच्या आधारावर शाखेला मोठे यश प्राप्त झाले असून शहरासह ग्रामीण भागात मोटारसायकलवर डल्ला मारणार्‍या टोळीतील संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर दुपारपर्यंत २० ते २५ मोटारसायकलचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची गोपनीय कारवाई सुरुच असून सुत्रांच्या माहितीनुसार सहा जणांना गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे.


बीड शहरासह ग्रामीण भागात होत असलेल्या मोटारसायकल चोरीने त्या त्या भागातील पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. गेल्या महिनाभरापासून बीडचे गुन्हे अन्वेषण विभागा जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील मोटारसायकल चोरीच्या टोळीचा माग घेत होते. गेल्या आठ दिवसांपुर्वीच २४ मोटारसायकल चोरट्यांकडून हस्तगत केल्या होत्या. दोन चोरट्यांच्याही मुसक्या बांधल्या होत्या. मात्र जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचा आकडा हा मोठा असल्याने बीडचे गुन्हे अन्वेषण विभाग टोळ्या आणि मोटारसायकल चोरीमध्ये सहभागी असणार्‍यांच्या मागावर होते. काल सकाळपासून गुन्हे अन्वेषण विभाग मोठ्या गोपनियतेने बीड शहरात आणि परिसरात संशयितांचा शोध घेत होते. अखेर रिपोर्टरच्या सुत्रानुसार पाच ते सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे संशयित पक्के मोटारसायकल चोर असल्याचे तेव्हा समोर येते जेव्हा आज दुपारपर्यंत पंचेवीसपेक्षा अधिक चोरीच्या मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या. मुसक्या बांधलेल्या सहा संशयितांची चौकशी केली असता बीडसह जिल्ह्यातल्या विविध भागातून या मोटारसायकली चोरल्या असून काही विकल्या आहेत. विकलेल्या मोटारसायकलीही आज पोलिसांनी परत आणल्या. या टोळीचा म्होरक्या कोण? याचा शोध आणि अन्य चोरलेल्या मोटारसायकलींचा शोध पोलिस घेत आहेत. पकडलेल्या संशयितांमध्ये ३० पेक्षा कमी वयाचे चोरटे असल्याचे दिसून येते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!