Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeकरिअर‘गुरुकुल’मध्ये ज्ञानार्जनापेक्षा धंद्याला महत्व नववीपर्यंत टॉपर असलेले विद्यार्थी दहावीला घसरले, ट्युशन लावले...

‘गुरुकुल’मध्ये ज्ञानार्जनापेक्षा धंद्याला महत्व नववीपर्यंत टॉपर असलेले विद्यार्थी दहावीला घसरले, ट्युशन लावले नाही म्हणून गुरुकुलच्या शिक्षकांनी घेतला विद्यार्थ्यांंचा बळी,


संतप्त पालक सीईओंना भेटणार, शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार करणार
बीड (रिपोर्टर):- पहिलीपासून नववीपर्यंत वर्गात नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेले टॉपर असलेले विद्यार्थी परीक्षा न घेतलेल्या यंदाच्या सीबीएसई दहावी वर्गात ऐंशी टक्क्यांवर आल्याचा प्रकार गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये उघडकीस आल्यानंतर पालकात संताप व्यक्त केला जात असून केवळ तेथील शिक्षकांकडे संबंधित विद्यार्थ्यांनी ट्युशन लावले नाही म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी सीईओंची भेट घेऊन ट्युशनमुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्‍या गुरुकुल शाळेविरुद्ध पालक तक्रार देणार आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल शिक्षण विभागाने घ्यावी आणि संबंधित शाळेची चौकशी करून जे विद्यार्थी मेरिटमध्ये आहेत त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
बीड शहरातील नावाजलेले गुरुकुल इंग्लिश स्कुल हे ज्ञानार्जनाचे गुरुकुल नव्हे तर शैक्षणिक धंद्याचे माहेरघर असल्याचे यंदाच्या सीबीएसई दहावीच्या निकालावरून स्पष्ट झाल्याचा आरोप पालक करत आहेत. इयत्ता पहिलीपासून नववीपर्यंत ९० टक्केपेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी यावर्षी मात्र ऐंशी टक्क्यांवर येऊन पोहचले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये कोरोनामुळे अवघे जग त्रस्त असताना विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन बंद असताना आमच्याकडे ट्युशन लावावा, असा तगादा येथील काही शिक्षक विद्यार्थ्यांकडे करायचे. जे विद्यार्थी ट्युशन लावत नाही त्यांना ‘तुमचा निकाल आमच्याच हातात आहे’, असे उघड बोलून दाखवायचे. ज्या विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांकडे ट्युशन लावले नाही त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे सीबीएसईच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे परीक्षा झाल्या नाहीत. मागच्या परफॉर्मसच्या आधारावर आणि चाचण्यांवर यावर्षीचा निकाल आहे. ज्या शिक्षकांकडे ट्युशन लावले नाही त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांचे या आधारे नुकसान केल्याचा आरोप पालकांनी करत थेट गुरुकुलच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन आपला संताप व्यक्त केला. जे विद्यार्थी आजपर्यंत टॉपर होते त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे पालक गुरुकुल विरोधात सीईओंकडे तक्रार करत हे प्रकरण थेट शिक्षण अधिकार्‍यांपर्यंत घेऊन जाणार असून विद्यार्थ्यांचे नुकसान करणार्‍या गुरुकुल इंग्लिश शाळेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
असं काही झालं असेल तर ‘त्या’ दोषींवर कारवाई करू
या गंभीर प्रकरणाबाबत रिपोर्टरने थेट गुरुकुलचे मुख्याध्यापक सर्वज्ञ यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, पालक आमच्यापर्यंत आले होते, त्यांनी संतापही व्यक्त केला परंतु आमच्याकडे असा काही प्रकार झाला नाही. जेव्हा रिपोर्टरने आजपर्यंत टॉपर असलेले विद्यार्थी परीक्षा न घेता घसरले कसे ? असा प्रश्‍न विचारल्यावर या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. उलट त्यांनी असा काही प्रकार घडला असेल तर दोषींवर कारवाई करू, असे रिपोर्टरशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!