धारूर (प्रतिनिधी) – धारूर पोलिसांनी जलद व प्रभावी कारवाई करत जबरी चोरीसह दोन गुन्ह्यांचा अवघ्या दीड तासांत छडा लावून दोन आरोपींना अटक केली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 130/2026 अंतर्गत फिर्यादी भागवत बबन कांबळे यांच्या तक्रारीनुसार, 6 एप्रिल रोजी आंबेवडगाव-धारूर मार्गावरील शिवराज ढाबा परिसरात उभ्या असलेल्या पिकअप वाहनातून जे.एस.डब्ल्यू. कंपनीचे रंगाचे (पेंट) डबे चोरीला गेले होते. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे 73 हजार 30 रुपयांचा रंगाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तपासादरम्यान मनोज ऊर्फ सोन्या चंद्रकांत घोळवे (वय 19, रा. आंबेवडगाव) व सुमित प्रमोद कंगने (वय 19, रा. धूनकवाड, ता. धारूर) या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून मेमोरँडम पंचनाम्यानुसार चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती 800 चारचाकी गाडी, एअर गन, चाकू, कोयता व मास्क अशी हत्यारसामग्रीही पोलिसांनी जप्त केली.
दरम्यान, याच काळात घडलेल्या दुसर्या घटनेत चोरंबा येथील बाळू भारत भालेराव यांना अडवून त्यांच्या जवळील मोबाईल फोन व खिशातील अडीच हजार रुपये नगदी जबरदस्तीने चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणात मोबाईल व रोख रक्कम मिळून सुमारे 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या गुन्ह्यातील मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भताने, हेड कॉन्स्टेबल मुंडे, गोविंद खाडे, शेख जमीर, अशोक कदम, मेजर शेख आदी पोलीस कर्मचार्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून अटक आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे









