Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमबीडच्या भाजी मंडईत भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले शहर पोलिस अन् चोरट्यांची मिलीभगत...

बीडच्या भाजी मंडईत भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले शहर पोलिस अन् चोरट्यांची मिलीभगत ?


बीड (रिपोर्टर):- शहरातील भाजी मंडईतून दररोज अनेकांचे मोबाईल चोरीला जातात, या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही पोलीस त्याची दखल घेत नाहीत. हे चोरटे वारंवार त्या ठिकाणी चोर्‍या करतात, मात्र पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याने हे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांची आणि शहर पोलीसांची मिलिभगत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. काल संध्याकाळी भाजी खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचा मोबाईल आणि पर्समधील १४ हजार रुपये चोरट्याने हातोहात लंपास केल्याची घटना घडली.


बीड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहरातील भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. याचाच फायदा घेऊन येथील भुरटे चोर लोकांचे मोबाईल आणि पैसे हातोहात लंपास करतात. दिवसातून अशा दोन ते तीन घटना घडतात. त्यासंदर्भात नागरिक शहर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करतात मात्र पोलिस केवळ कागदोपत्री तक्रार घेतात मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी एकही चोरटा पकडला नाही किंवा मुद्देमाल जप्त केला नाही. हे ठराविक चोरटे दररोज भाजी मंडईत येतात. येथील भाजी विक्रेत्यांना चोरटे कोण आहेत हे माहित आहे. सदरील चोरटे आल्यावर भाजी खरेदी करणार्‍या महिला आणि नागरिकांना काही महिला सावधही करतात मात्र पोलिसांना ते सापडत नाहीत हे विशेष. पोलिसांची आणि त्यांची मिलिभगत असल्याचे यावरून स्पष्ट होते. छब्बू माधवराव बोराडे या अंगणवाडी सेविकेने बीड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काल दुपारी ३ वाजता शहरातील भाजी मंडईत भाजी खरेदी करत असताना त्यांच्या पर्समधील नगदी १४ हजार रुपये आणि एक रेडमी कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी त्यांनी फिर्याद दिली असली तरी पोलिस चोरट्यांचा शोध घेत नाहीत.
थातूरमातूर कारवाई करून
फिर्यादींना उडवाउडवीचे उत्तर

आम्ही दक्ष आहोत, तुमचे चोरीस गेलेले मोबाईल परत मिळवून देण्यासाठी मोबाईल ट्रॅकिंग करत आहोत, असे फिर्यादींना सांगितले जाते प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे मोबाईल ट्रॅक का होत नाही. आतापर्यंत किती जणांना बीड शहर पोलिसांनी भाजी मंडईतून गेलेले मोबाईल सापडून दिले? हा संशोधनाचा विषय आहे.

Most Popular

error: Content is protected !!