7 कोटींपेक्षा अधिक रक्कम असलेल्या 136 ठेवीदारांच्या तक्रारीवरून
बबन शिंदेंसह पत्नी, मुलगा व संचालक मंडळावर गुन्हा दाखल
ठेवीदारात
प्रचंड खळबळ, अनेकांची बीपी, शुगर वाढली
बीड (रिपोर्टर) जास्त व्याजाचे अमिष दाखवून तब्बल 150 कोटी रुपये जमा करत ते पैसे ठेवीदारांना न देता इतरत्र खर्च करून ठेवादारांची फसवणूक केल्या प्रकरणाची तक्रार अॅड. संतोष जगताप यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर बीडच्या जिजाऊ मॉ साहेब मल्टिस्टेट कॉप.क्रेडिट सोसायटी लि. बीडच्या अध्यक्षासह संचालक मंडळ व या बँकेचा कारभार पाहणारे बबन शिंदे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी जगताप यांचे व त्यांच्या भावाचे तब्बल 53 लाख 24 हजार 975 रुपये आणि 136 ठेवीदारांचे 7 कोटी 19 लाख 27 हजार 987 रुपये एकूण 7 कोटी 72 लाख 52 हजार 962 रुपये घेऊन संबंधित पसार झाले आहेत.
याबाबत अधिक असे की, बीड शहरातल्या राजीव गांधी चौक येथे बबन शिंदे यांची जिजाऊ मॉ साहेब मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये या सोसायटीमध्ये शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी मोठ्या विश्वासाने ग्राहकांनी ठेवल्या. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी या मल्टिस्टेट सोसायटीने लोकांचे परतावे देण्यास बंद केले. गेल्या काही दिवसांपूर्वी सोसायटीसमोर मोठा गोंधळ झाला. त्यावेळी बबन शिंदे यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून आपण आजारी असल्याचे कारण पुढे करत सर्वांचे पैसे देणार असल्याचे म्हटले. बबन शिंदे यांनी दिलेली तारीख उलटून गेल्यानंतरही पैसे देत नसल्याने काल रात्री अॅड. संतोष आप्पासाहेब जगताप (रा. राजावाडा, चाणक्यपुरी, बीड) यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली. आपले व आपल्या भावाचे तब्बल 53 लाख 24 हजार 975 रुपयांच्या ठेवी संबंधित बँकेकडे आहे. बँकेचे अध्यक्ष अनिता बबन शिंदे व मुलगा मनिष बबन शिंदे यांनी वेळोवेळी आपल्या घरी येऊन, रस्त्यावर भेटून वार्षीक 13 टक्के दराचे आमिष दाखवून आपल्या सोसायटीमध्ये पैसे ठेवण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या कटकारस्थानाला बळी पडून आपण त्याठिकाणी पैसे ठेवले, असे म्हणत आपली फसवणूक झाल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर बबन शिंदे यांनी सोसायटीतील रकमेचा अपहार करून शैक्षणिक संस्था, मेडिकल कॉलेज आणण्यासाठी त्या पैशांचा वापर केल्याची आणि पुणे जिल्ह्यात 40 एकर जमीन, दोन प्लॉट तसेच औरंगाबाद, दिल्ली येथे प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवल्याबाबतचे म्हटले आहे. बीड येथील प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा संबंधितांनी सुरू ठेवल्याचे सांगत आपल्यासह तब्बल 136 ठेवीदारांचे 7 कोटी 72 लाख 52 हजार 962 रुपये घेऊन हे सर्व पसार झाले असल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. त्याचबरोबर जगताप यांनी या सोसायटीमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपये ठेवीदारांच्या ठेवी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसात संबंधित सोसायटीच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बँकेचे कर्तेधरते आणि मुख्य बबन शिंदे, त्यांचा मुलगा मनिष शिंदे, अश्विनी सुनिल पांढरे व बँकेच्या सर्व संचालक मंडळाविरोधात कलम 406, 409, 420, 120-बी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी हे परार असल्याचे सांगण्यात येते.