बीड (रिपोर्टर)ः- शहरातील विविध रस्ते चांगले झाले असले तरी काही रस्त्याचे काम अपुर्ण राहीलेले आहे. त्यामध्ये बशीरगंज ते चांदणी चौक या रस्त्याचा समावेश आहे. सदरील रस्त्यावर जागो जागी मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांची रस्त्याने ये-जा असते. खडयामुळे वाहनधारकांना गाड्या चालवण्यास अडचणी येवू लागल्या. या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात रहदारी असल्याने रस्ता होणे गरजेचे आहे. नगर पालिका प्रशासनाने रस्त्याचे काम तात्काळ करण्याची मागणी केली जात आहे.
बीड शहराअंतर्गत नगर पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन सिमेंट रस्ते केले. मात्र काही रस्ते अद्यापही अपुर्ण राहीलेले आहे. अपुर्ण रस्त्यामुळे वाहनधारकांना विविध अडचणीला तोंड दयावे लागते. शहरातील मुख्य बाजार पेठेतील बशीर गंज ते चांदणी चौक हा रस्ता खराब झाला. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. ज्या प्रमाणात सुभाष रोड तात्काळ झाला त्याच प्रमाणात बशीर गंज ते चांदणी चौक हा रस्ता व्हायला पाहीजे होता मात्र तो अद्यापही झाला नाही. जशी या रस्त्याची अवस्था आहे. तशीच मोंढा रोडच्या रस्त्याची अवस्था झालेली आहे. या दोन्ही रस्त्यावर वाहन धारकांची नेहमी रहदारी असते. नगर पालिका प्रशासनाला रस्ता नवीन करण्यासाठी कधी मुहूर्त सापडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान बशीरगंज ते चांदणी चौक रस्ता तात्काळ करण्याची मागणी या भागातील नागरीकांकडून केली जात आहे.