चुंबळी फाट्यावर गृह मंत्र्यांचा पुतळा जाळला,केज, लिंबागणेश मध्ये रास्ता रोको आंदोलन
बीड/ठिकठिकाणचे(रिपोर्टर)ः- अंतरवली सराटी येथे शांततेेच्या मार्गाने आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनाने अमानुषपणे मारहाण केल्याने याचे तिव्र पडसाद आज राज्यभरामध्ये उमटले. बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. आज या बंदमध्ये सर्व व्यापार्यांनी सहभाग घेतला. आष्टी, पाटोदा, शिरुर, गेवराई, माजलगांव, अंबाजोगाई, परळी, नेकनूर, केज, लिंबागणेश, गढी, चौसाळा, नांदुरघाट यासह अन्य भागामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. चुंबळीफाटा याठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्यावतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी डॉ.जितेंद्र ओव्हाळ यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. केजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आजच्या या बंदला केज जनविकास आघाडीने आपला पाठींबा दर्शविला. लिंबागणेश या ठिकाणीही रास्ता रोको करण्यात आला होता. काही ठिकाणी टायर जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.