बीड (रिपोर्टर): मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू पाहणार्या ताडसोन्ना येथील राजााभाऊ चोले याच्या विरोधात पिंपळनेर पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी रात्री पिंपळनेर पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर मराठा युवक जमा झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. आतापर्यंत त्यांचे दोन आमरण उपोषण झाले असून आरक्षणाबाबत जरांगे यांनी सरकारला अल्टिमेट दिलेला आहे. राज्यभरात मराठा समाजाने जरांगे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत ताडसोन्ना येथील राजाभाऊ रामदास चोले या व्यक्तीने मनोज जरांगे यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. सदरची पोस्ट ही पिंपळनेर येथील संतोष ज्ञानोबा जाधव यांनी पाहितली. तोपर्यंत ती पोस्ट पिंपळनेर परिसरातील अनेक तरुणांच्या नजरेस पडली. ताडसोन्नासह परिसरातील मराठा तरुणांनी तात्काळ पिंपळनेर पोलीस स्टेशन गाठले. चोले विरोधात गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी संतोष जाधव यांनी रितसर फिर्याद दिल्यानंतर चोले याच्याविरोधात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. चोले याच्या पोस्टचा सर्वस्तरातून निषेध होत असून जो कोणी सामाजिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकील त्याविरुद्ध पोलीस कठोर कारवाईची भूमिका घेतील, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.