उद्या सोहळ्यानिमित्त 1960 पासूनचे विद्यार्थी शाळेत येणार
जिल्हाधिकारी, एस.पी., मुख्याधिकार्यांसह प्रशासनातील अनेक मान्यवरांचे उपस्थिती
बीड (रिपोर्टर): पिंपळनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला तब्बल शंभर वर्षे पुर्ण झाले. त्यानिमित्ताने गावकर्यांनी शतकपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले असून उद्या 17 नाव्हेंबर रोजी शतकपूर्ती सोहळा होत असून या सोहळ्यासाठी इ.स. 1960 पासून ते आजपावेत जे जे विद्यार्थी या शाळेत शिकले ते विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते होणार असून जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, श्रीकांत कुलकर्णी, क्रीडाधिकारी सुहासिनी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कार्यक्रमानिमित्त गणेश शिंदे व वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजीत केले आहे.
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला शंभर वर्षे झाले आहेत. त्यानिमित्त शतकपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले असून सकाळी 8 ते 10 या वेळेत पुस्तक दिंडी काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी गेल्या एक महिन्यापासून पिंपळनेर येथील तरुण वर्ग झटत असून या कायक्रमासाठी किमान 10 हजारपेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार असल्याने तसे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचा शतकपूर्ती सोहळा साजरा करणारे पिंपळनेर हे गाव राज्यात पहिले असणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेकडे सातत्याने दुर्लक्षितपणे समाजासह शासन आणि प्रशासन पहात असते. मात्र पिंपळनेरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त करून दिले आहे. या कार्यक्रमासाठी इ.स. 1960 पासून ते आजपावेतचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या शाळेने प्रशासनाला अनेक उच्चपदस्थ अधिकारी दिले. हायकोर्टाचे जज दिले. प्रशासनातल्या सर्व खात्यांमध्ये कर्मचार्यांपासून अधिकार्यांपर्यंत आजही सेवा करत आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक क्षेत्रातही मोठमोठे नाव कमावणारे या शाळेतून शिक्षण घेऊन गेले. हे सर्व उद्या 17 नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. यानिमित्ताने कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गावकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.