बीड नगरपालिकेने घरकुल धारकांचा चौथा हप्ता अद्याप दिला नाही
घराचे काम रखडले, लाभार्थी न.प.त चकरा मारू मारू बेजार
बीड (रिपोर्टर): पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागासह शहरी भागात सर्वसामान्य नागरीकांना घरकुल बांधून दिले जातात, बीड शहराअंतर्गत अनेक घरकुलांचे प्रस्ताव निकाली काढून त्यांचे काही हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. ज्यांचे हप्ते पडले त्यांनी घराचे बांधकाम केले, चौथा हप्ता अद्याप वर्ग झाला नसून या चौथ्या हप्त्यासाठी संबंधित लाभार्थी दररोज न.प. कार्यालयात चकरा मारतात, तरी देखील त्यांना पैसे मिळत नाही. न.प.ने तात्काळ चौथा हप्ता लाभार्थ्यांना वाटप करावा, अशी मागणी केली जाऊ लागली.
2024 पर्यंत ज्यांना घरे नाहीत त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. दरवर्षी जिल्हाभरात हजारो घरकुलांचे प्रश्न मार्गी लावले जातात. ग्रामीण भागासह शहरी भागात घरकुल बांधून दिले जात आहेत. गेल्या वर्षी बीड शहरात काही टार्गेट पुर्ण करण्यात आले. त्यातील तीन हप्ते संबंधित लाभर्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. पैसे मिळाल्याने संबंधितांनी घरकुलाचे बांधकाम केले मात्र चौथ्या हप्त्याअभावी काहींचे बांधकाम रखडले. चौथा हप्ता द्यावा, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थी बीड नगरपालिकेकडे करत आहेत. तरी देखील त्यांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत. न.प. सीओंनी तात्काळ चौथा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, अशी मागणी केली जात आहे.