बीड(रिपोर्टर): मागील दोन लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपा विरोधात उमेदवार देत लोकसभेची निवडणूक चर्चेत ठेवणार्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या वर्षी मात्र बीड लोकसभा मतदार संघात आपला उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्याचे लक्षात येत असून महाविकास आघाडीकडे शरद पवार यांनी राज्यातल्या आठ लोकसभा मतदार संघावर दावा सांगितल्याने बीड बाबत पुष्टी मिळत आहे. पवारांनी जळगाव, दिंडोरी, रामटेक, माढा, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा एवढ्याच लोकसभा मतदार संघात ते लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. त्यानुसार त्या भागातील कार्यकर्त्यांना निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र महाविकास आघाडीत शरद पवार गटाला आठ जागा मिळणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूकीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. कारण त्यांनी महाविकास आघाडीकडे 8 मतदार संघावर दावा सांगितला आहे. राज्यातल्या जळगाव, दिंडोरी, रामटेक, माढा, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा या 8 मतदार संघावर शरद पवार गटाची ताकद असल्याचे सांगितले जाते. परंतू बीड जिल्ह्याला आपला गढ समजणारे शरद पवार यांच्याकडून बीड मतदार संघावर मात्र दावा केल्याचे दिसून येत नाही. गेल्या दोन लोकसभा निवडणूकीत अवघ्या राज्याचे लक्ष त्यांनी या मतदार संघाकडे लावून ठेवले होते. स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात तेव्हा शरद पवार यांनी सुरेश धस यांना उभे केले होते. त्यानंतर मुंडेंचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यानंतर पोट निवडणूकीत मात्र शरद पवार यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार मुंडेंच्या कन्या प्रितम मुंडे यांच्या विरोधात दिला नव्हता, मात्र 2019 च्या लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांना प्रितम विरोधात निवडणूक आखाड्यात उतरवले होते. यावेळेस 2024 च्या लोकसभा निवडणूकीत मात्र शरद पवार यांनी बीड मतदार संघात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीकडे केवळ 8 लोकसभा मतदार संघावर त्यांनी दावा केला आहे. हे 8 मतदार संघ पवार गटाला मिळणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदाराच्या आधारे सर्वाधिक जागा मागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काँग्रेसही यात वेगळ्या जागांसाठी आग्रही असणार आहे.