पिंपळनेर (रिपोर्टर): गेल्या काही दिवसांपासून पिंपळनेरसह परिसरामध्ये भुरट्या चोरांचा धुमाकूळ पहावयास मिळत आहे. काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पिंपळनेर येथील दोन शेतकर्यांच्या दोन गाईंसह बैलांना चोरून नेले. त्याची अंदाजे किंमत तब्बल एक लाख 10 हजार रुपये एवढी असून या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शेतकर्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक असे की, घाटसावळी रोड परिसरात राहणारे असाराम सुखदेव नरवडे या शेतकर्याच्या गोठ्यातील व अन्य एका शेतकर्याच्या दोन गाइर्ं, दोन बैल अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरून नेल्या. या प्रकरणी आसाराम नरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गु.र.नं. 257/2023 कलम 379, भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन-चार महिन्यांच्या कालखंडात पिंपळनेरसह परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ पहावयास मिळत आहे. चंदनचोरांसह घरफोडीच्या घटना अधिक होताना दिसून येत आहे. रात्री रस्त्याच्या कडेला असलेल्या गोठ्यातून जनावरे चोरीस गेल्याने येथील नागरिकांना असुरक्षित वाटत असून पोलिसांनी रात्रीची गस्त वौवावी, अशी मागणी होत आहे.