पथकातील पाच पोलिसांचे लोकेशन आणि ट्रक चालकाच्या मोबाईल लोकेशन तपासा
बीड (रिपोर्टर): राज्यात सुरू असलेल्या गुन्हेगारीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक पत्र व्हायरल करून जनता आणि पोलीस यांच्यात विश्वास संपादन करण्या हेतू आपण काम करत असल्याचे म्हटले असले तरी बीडमध्ये मात्र पोलिसांची लाचखोरी मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरत आहे. परवा संध्याकाळी लाखो रुपयांचा गुटखा घेऊन जाणारा मोठा ट्रक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या पथकाने पकडला. मात्र तो पोलीस ठाण्यात न आणता पात्रूड चौकात उभा करून तब्बल चौदा लाखांची तोडपाणी करत सोडून दिल्याचे सांगण्यात येते. याची माहिती धिरजकुमार यांना आहे की नाही? हे समजू शकले नाही मात्र पथकातील पाच जणांनी ही तोडपाणी केल्याचे सांगण्यात येते. संबंधितांमध्ये एकजण अशाच गुटख्याच्या तोडपाणीत याआधीही अडकलेला होता. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तोडपाणी करणार्या त्या पाच पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अवैद धंद्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आपले वेगवेगळे पथके तयार केले आहेत. माजलगाव येथील डिवायएसपी डॉ. बी. धिरजकुमार यांचेही पथक असून सदरचे पथक हे तोडपाणीत अग्रेसर असल्याची जाहीर चर्चा होत असतानाच परवा दिवशी म्हणजे 9 तारखेच्या संध्याकाळी या पथकातील पाच जणांनी चौदा लाखांची तोडपाणी केल्याची माहिती समोर येत आहे. स्विफ्ट कारमध्ये या पोलिसांनी देवदहिफळ परिसरात गुटखा घेऊन जाणारा ट्रक (क्र. एच.आर. 55 ए.ओ.4428) हा अडवला. त्यामध्ये 27 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा गुटखा असल्याचे सांगण्यात येते. हा ट्रक या पोलिसांनी पात्रूड चौकात आणला. रात्री साडेबारा ते एक वाजेपर्यंत हा ट्रक त्याच ठिकाणी उभा होता. या वेळी सदरचा गुटखा जप्त करून तो पोलीस ठाण्यात न्यायला हवा होता मात्र धिरजकुमार यांच्या पथकातील पाच पोलिसांनी यात तोडपाणी केली. ती थोडी थिडकी नसून 14 लाखांची असल्याचे सांगण्यात येते. पैसे घेऊन नंतर हा गुटख्याचा ट्रक सोडून देण्यात आला. जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या प्रकरणी चौकशी लावली आणि संबंधित पाच पोलीसांंचे परवा 9 तारखेचे सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेबारा-एक वाजेपर्यंतचे मोबाईल लोकेशन पाहिले तर ते एकच येईल, असेही रिपोर्टरच्या सुत्राने सांगितले. याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर संबंधित पोलिसांनी शप्तावार असे काही झाले नसल्याचे सांगितले. मात्र यातील एक-दोन पोलीस असे आहेत त्यांच्यावर जप्त केलेला गुटखा घरी घेऊन जाणे, तोडपाणी करणे याचे आधी आरोप लागलेत यात पोलीस चौकशीही झाली आहे. त्याच पोलिसांकडून पुन्हा तोडपाणीसारख्या घटनांना अंजाम देत एकप्रकारे वाटमारी सुरू असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करर्याची मागणी होत आहे.
धिरजकुमारजी आपले चांगले काम, पथकाने वेशीला टांगले
डीवायएसपी धिरजकुमार आपले माजलगाव परिसरातले काम अत्यंत चांगले असल्याचे तेथील जनतेकडून सांगितले जाते मात्र आपल्या पथकातील लोक सर्रासपणे तोडपाणी करून गुन्हेगारीला आणि अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत आहेत. गुटखा विकणार्या फेरीवाल्यापासून ते 9 तारखेला घडलेल्या 14 लाखांच्या तोडपाणी प्रकरणाची चौकशी केली तर सर्व सत्य बाहेर येईल.
एसपी ठाकूर साहेब, त्यांचे लोकेशन तपासा
परवा जी एच. आर. 55 ए.ओ. 4428 क्रमांकाची गुटख्याची गाडी सायंकाळी साडेपाच ते साडेबारा एक वाजेपर्यंत ज्या रस्त्यावर होती शेवटी ती पात्रूड चौकात आणून उभा केली. त्याठिकाणी धिरजकुमार यांच्या पथकातील पाच पोलिसांचे मोबाईल लोकेशन तपासले तर ते तिथेच येईल. आम्ही संबंधित गाडीचा नंबर छापत आहोत, अत्यंत विश्वासू बातमी असल्याचे संबंधित ट्रकचा शोध घेऊन संबंधित चालकाच्या मोबाईलचे लोकेशन तपासले तरी या पाच पोलिसांचे लोकेशन एक येईल. नवले आणि देशमुख नावाच्या पथकातील पोलिसांचा हा तोडपाणीचा प्रताप आहे. तब्बल 14 लाखांची तोडपाणी झाली आहे.











