पुणे (रिपोर्टर): भलेही निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही तरी अजितदादांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार घराघरात घेऊन जा, आज प्रत्यक्ष निवडणूक लढवण्यापेक्षा पडद्याआड राहून पक्षासाठी काम करणार्यांना राजकारणामध्ये अनन्यसाधारण महत्व आले आहे. येणारा काळ हा आपला असेल. 2024 साली दादांना मुख्यमंत्री करायचं आहे. आजच्या तरुणांना दादा मुख्यमंत्री झाल्याचं पहायचं आहे. असे सांगून ‘वादाचा पक्का अजितदादा’ असे गौरवोद्गार राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काढून अजित पवार हे 2024 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असणार असल्याचे म्हटले.
ते पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. या वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, शब्द देऊन तो शब्द पुर्ण करणारे हे अजितदादा आहेत. अजितदादांचं व्यक्तिमत्व हे वादा निभावणारं व्यक्तिमत्व आहे. आज इथे मोठ्या संख्येने तरुणांसह राष्ट्रवादीच्या विचारांवर चालणार्या अबालवृद्धांची उपस्थिती आहे. दादांची विकासाची दृष्टी ही महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी आहे. मागच्या काळात दादांसह आम्हा सर्वांना काय त्रास झाला असेल ते आम्हाला माहित आहे, परंतु राज्याचा विकास हेच ध्येय धोरण दादांनी समोर ठेवले. पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटत असेल, निवडणुकीमध्ये संधी मिळावी. परंतु पडद्याआड काम करणार्यांना राजकारणामध्ये आज अधिक महत्व आलेलं आहे. भलेही निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळाली नसली तरी पक्षाचा विचार आणि अजितदादांचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, हेच 2024 चे मिशन असेल. 2024 साली दादांना मुख्यमंत्री करायचं आहे. इथल्या प्रत्येकाला दादा मुख्यमंत्री झाल्याचे पहायचे आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.












