तातडीने टँकर सुरू करण्याची बीडीओंची ग्वाही
बीड (प्रतिनिधी)
दि.30 : तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून चारा, पाणी टंचाईचा प्रश्न सोडवावा. तसेच, दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांच्याकडे शनिवारी (दि.30) केली आहे. यावेळी आवश्यक तिथे तातडीने टँकर सुरू करण्याची ग्वाही पंचायत समिती प्रशासनाने दिली आहे.
बीड तालुक्यातील चारा, पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांची पंचायत समिती कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. ज्या गावात पाणी टंचाई असल्याने टँकरची मागणी होत आहे, तिथे टँकर तातडीने सुरू करावेत. त्याअनुषंगाने काही ग्रामपंचायतीचे मागणी, ठरावाची यादी प्रशासनाला दिली. आवश्यक तिथे विहिरींचे अधिग्रहण करण्यात यावे. याबाबतचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मंजूर करावेत. जलजीवन मिशन योजनेची रखडलेली कामे गतीने व्हावीत, अशा मागण्या करण्यात आल्या. चारा टंचाईच्या अनुषंगाने प्रशासनाने पाऊले उचलावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र राऊत, पं.स.चे माजी सदस्य सुनिल झोडगे, काकासाहेब जोगदंड, सरपंच अमोल बागलाने, महादेव खोसे, सुनिल अनपट, राम बहिरवाळ, प्रमोद नाईकवाडे, रमेश रांजवण, विठ्ठल गुजर, मिलिंद ठोकळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
लवकरच सुरू होणार टँकर
बीड तालुक्यातील चारा, पाणी टंचाईचा प्रश्न तातडीने सोडविला जाईल, अशी ग्वाही गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी दिली. प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावून लवकरच टँकर सुरू करू. आवश्यक तिथे विहिर अधिग्रहण केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.












