पोलिसांनी रोड रोमिओंना धडा शिकवावा
बीड (रिपोर्टर): शहरामध्ये अनेक ठिकाणी कोचींग क्लासेस सुरू आहेत. या परिसरात रोड रोमिओंची संख्या जास्त प्रमाणात दिसून येते. हे रोड रोमिओ येता-जाता मुलींची छेडछाड करत आहेत. माने कॉम्प्लेक्स आणि उमाकिरण टॉकीजच्या परिसरातील क्लासेस परिसरात मुलींची छेडछाड होऊ लागली आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालून संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
रोडरोमिओंना अद्दल घडविण्यासाठी पुर्वी चिडीमार पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. हे पथक चांगल्या पद्धतीने सक्रिय होते, मात्र हे पथक बंद करण्यात आले. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसर आणि पांगरी रोडवरील उमाकिरण टॉकीज या परिसरात मोठठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेस आहेत. या ठिकाणी मुलींची संख्या जास्त असते. याचाच गैरफायदा काही रोडरोमिओ उठवून मुलींची छेडछाड करत आहेत. रस्त्यावर धिंगाणा घालणे, आरडाओरड करणे, जास्त वेगाने गाड्या पळविणे, हॉर्न वाजविणे, असे प्रकार पांगरी रोडवर वाढले आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कोचिंग क्लासेसही सिक्युरिटीबाबत तितके गंभीर नाहीत. काल माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये एका मुलीची छेड काढण्यात आली होती. त्यामुळे सदरील मुलगी रडत होती. दरम्यान पोलीस प्रशासनाने रोडरोमिओंबाबत सक्तीची भूमिका घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.