आष्टी (रिपोर्टर): छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, जात-पात-धर्म-पंथ त्यांनी पाहिलं नाही, मीही शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा घेऊन काम करत आलो आहे. हा बीड जिल्हा जाती-पातीला नाही तर विकासाला महत्व देणारा जिल्हा आहे. संघर्ष करणार्यांच्या पाठिशी उभा राहणारा जिल्हा आहे. याच जिल्ह्याने सांगली-सातार्याच्या क्रांतीसिंह पाटलांना निवडून दिलं, या जिल्ह्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं. मुंडे साहेब हे मराठवाड्याचं दैवत आहे आणि त्यांच्याच संघर्षाचा वारसा पंकजा चालवत आहेत. त्यामुळे पंकजांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा, त्यानां निवडून द्या, आणि संसदेत पाठवा, त्यांच्या मंत्रीपदासाठी मी शिफारस करेल, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनवणे यांना लक्ष करताना जो स्वत:च्या मुलीला नगरपंचायत, ग्रामपंचायतवर निवडून आणू शकत नाही तो खासदारकीला कसा निवडून येणार? असा टोला लगावला तर राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या जनतेने कधी जातीपातीवर मतदान केले नाही. विकासाला मत दिले. त्यामुळे आताही पंकजाताइर्ंंना संसदेत पाठविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
ते आष्टी येथील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. या वेळी व्यासपीठावर छत्रपती उदयनराजे भोसले, महादेव जानकर, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, बाळासाहेब आजबे, सुरेश धस, भीमराव धोंडे, सतीश शिंदे, पप्पू कागदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बीड लोकसभेचं नेतृत्व स्व. गोपीनाथ मुंडेंनी केलं होतं. मुंडे हे मराठवाड्याचं दैवत आहे, त्यांना प्रथम अभिवादन करतो. हा जिल्हा संघर्ष करणार्यांच्या पाठिशी उभा राहणारा जिल्हा आहे. क्रांतीवीर क्रांतीकारी नाना पाटलांना त्यांनी निवडून दिलं. संघर्ष करणार्यांना हा जिल्हा निवडून देत आला आहे. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील जनतेसाठी लढत आहेत. स्व. मुंडेंचे विचार पुढे नेत आहे, विकासाचं राजकारण करत आहे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. ही भावकी, गावकीची निवडणूक नाही तर देशाच्या भवितव्याची आणि जिल्ह्याच्या विकासाची निवडणूक आहे, भावनिक होऊ नका, विकासाला मतदान करा, मराठवाड्याला जेवढी गरज असेल तेवढा निधी मी देतो, अर्थमंत्री म्हणून मी हा शब्द देतो, मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी केंद्राची मदत लागते आणि वेळोवेळी मोदी साहेब आपल्याला ही मदत करत आहेत. कांद्यावरची निर्यात बंदी मोदींनी उठविली, तुमची माझी जात ही शेतकर्याची जात आहे. दुधाला पाच रुपये अनुदान दिले, ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना आचारसंहिता संपल्याबरोबर पैसे मिळतील. काल फडणवीस बोलून गेले, परंतु महायुतीत सगळे बसून आष्टीची उमेदवारी देऊ, जो व्यवस्थीत काम करेल, जोशाने काम करेल, त्याचा विचार केला जाईल. मोदींच्या मंत्रिमंडळात पंकजांना घ्या, अशी शिफारस मी करेल, असेही अजित पवार म्हटले. प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनवणेंच्या छातीत कधीकाळी हेव दिसायचा तेव दिसायचा, अरे छाती फाटेल, तू स्वत:ला खरा बजरंगबली समजतो की काय? त्याच्या कारखान्याची कॅपेसिटी मी वाढविली, पैसा मी दिला, तो याच्यामुळे दिला, मला माहित होतं तो एक ना एक दिवस मारील, ‘उडी’ म्हणतो मी. चांगलं चाललं होतं, बरं चाललं होतं… कशाला अवदसा आठवली. काही काहींना दोन पैसे आले की, मस्ती येते, परंतु जो मला सोडू शकतो तो तुम्हालाही सोडू शकेल. जो स्वत:च्या मुलीला पंचायतीत निवडून आणू शकत नाही तो खासदारकीला कसा निवडून येणार? इथं मुस्लिमांना भीती दाखविली जाते, दलितांना संविधान बदलण्याची भीती दाखविली जाते. अरे संविधानदिन खरं तर नरेंद्र मोदींनी सुरू केला. त्यामुळे कुणाच्याही भुलथापांना बळी पडू नका, जातीपातीला बळी पडू नका, पंकजा मुंडेंना लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.












