माजलगाव :ऑनलाईन रिपोर्टर
कर्जबाजारीपणा व उपोषण करुनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार (दि.१५) सकाळी वडगावात उघडकीस आली आहे. दत्ता कालीदास महिपाल (रा.शिंदेवाडी, ता.माजलगाव, जि.बीड, ह.मु.वडगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दत्ता याने त्याचा लहान भाऊ महेश याच्या व्हॉटसअॅप नंबरवर सुसाइड नोट पाठवली होती.
दत्ता महिपाल हा तरुण मुळचा बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी येथील रहिवाशी असून काही दिवसापूर्वी तो रोजगाराच्या शोधात वाळूज उद्योगनगरीत आला होता. उद्योगनगरीत रोजगाराची संधी मिळाल्याने दत्ता हा वडगावातातील विलास शेजवळ यांच्या घरात भाड्याने एकटाच राहत होता. मंगळवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास दत्ता याने सुसाइड नोट लिहून लहान भाऊ महेशच्या व्हॉटसअॅप नंबरवर पाठविली होती. मात्र महेश हा झोपेत असल्याने तो वाचू शकला नाही.
दरम्यान, आज बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास महेशने मेसेज पहिला. त्यानंतर घाबरलेल्या महेशने नातेवाईक अशोक सुरवसे यांच्याशी संपर्क साधत दत्ताकडे जाण्यास सांगितले. घरमालक आणि सुरवसे यांनी रूममध्ये पाहिले असता दत्ता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. अत्यवस्थ दत्ता यास शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून दत्ताला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सुसाइड नोटमधून दिले कारण
दत्ताने त्याचा लहान भाऊ महेश याच्या व्हॉटसअॅपवर पाठविलेल्या चिठ्ठीत, ”‘ आय लव यु बद्रर ॲण्ड ऑल’ तसेच मी काही कारणावरुन फाशी घेत आहे. माजलगाव येथील गोपाला अर्बन या बॅंकेकडून मी १ लाख रुपये कर्ज घेतले होते. पण काही हप्ते न भरल्याने बॅंकेकडून रोज फोन येत असल्याने मी खुप त्रस्त झालो होतो. मोठ्या बिझनेस वाले कर्ज घेतात व न भरता पळून जातात, विजय माल्या असेल किंवा निरव मोदी असेल त्यांना कुणी काही बोलत नाही. पण शेतकऱ्यांनाच सर्व बोलतात. दुसरे कारण मराठा आरक्षण मिळत नाही, कारण काय आहे, मी उपोषण करुन काय फायदा झाला नाही, सरकारने याची भरपाई करावी, स्वाॅरी मम्मी-पप्पा सुखी रहा, तुमचा दत्ता”, असा मजकूर सुसाइड नोटमध्ये आढळून आला.