बीड (रिपोर्टर): बीड शहरासह जिल्ह्यात वाढदिवस धुमाकूळात साजरा करण्याचे फॅड झाले आहे. रात्री अशाच युवा नेत्याचा वाढदिवस शहरापासून काही अंतरावर असलेल्या चर्हाटा फाट्यावरील स्वागत लॉन्स समोर साजरा करण्यात येत होता. या वेळी त्याठिकाणी हवेत गोळ्या झाडून केक कापण्यात आल्याची जोरदार चर्चा होत आहे. मात्र गोळीबार झाला का? याबाबत पोलिसांकडून दुजोरा दिला जात नाही. विशेष म्हणजे पाच-पन्नास पोलीसही लव्याजम्यासह रात्री घटनास्थळावर गेले होते. त्याठिकाणी त्यांना काही मिळून आले नसल्याचे सांगण्यात आले.
वाढदिवस साजरा करताना आजची तरुण पिढी भान हरपून धुमाकूळ घालत वाढदिवस साजरा करताना दिसून येते. कोणी तलवारीने केक कापतो, कोणी रात्री दहानंतर बेफामपणे फटाक्यांची आतिषबाजी करत कायद्याला धाब्यावर बसवतो तर कोणी थेट गोळीबार करत केक कापत असल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडत आहेत. रात्री शहराबाहेर एका युवा नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरासह अन्य भागातून पाच-पन्नास गाड्यातून त्याठिकाणी त्याचे मित्र आले. केक कापताना बहाद्दरांनी थेट हवेत गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा बीड शहरातून पाच-पन्नास पोलिसांचा लवाजमा घटनास्थळाकडे गेला तेव्हा उपस्थित युवा नेत्याकडे अथवा अन्य कोणाकडे काही मिळून आले नाही. परंतु गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा सध्या बीड शहरात होत आहे.