उलटसुलट चर्चेला उधान
माजलगाव (रिपोर्टर): विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी दोन दिवसांपूर्वीच सक्रिय राजकारणातून निवृत्त होत आपले पुतणे जयसिंह सोळंके यांना माझ्यावर केले तसे प्रेम करा, साथ द्या चे आवाहन समर्थकांना करून आ. सोळंकेंनी महाराष्ट्रातल्या काका-पुतण्याच्या राजकारणाला नवा आयाम दिला खरा, परंतु आज आ. सोळंकेंच्या धाकट्या सूनबाई पल्लवी सोळंके यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्यावर सरशेवटी ‘तरीही तुतारी वाजणार का?’असा शब्दप्रयोग केला. त्यामुळे माजलगाव मतदारसंघात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.
आ. प्रकाश सोळंके यांच्या धाकट्या सुनबाई पल्लवी सोळंके यांनी आज सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान फेसबुकवर एक पोस्ट केली. आ. प्रकाश सोळंकेंसह त्यांच्या सौभाग्यवतींचा फोटो टाकत त्या पोस्टवर मा. प्रकाश दादांनी काल राजकीय निवृत्तीची घोषणा केली आणि संपुर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण केला, जे एकापेक्षा एक दिग्गजांना जमले नाही, ते दादांनी करू दाखवले. कर्तृत्व, कार्य, विकास आणि लोकांची जिंकलेली मने ही कधीही संपुष्टात न येणारी गोष्ट. या गोष्टी सिद्ध होण्यासाठी वयाच्या 83 व्या वर्षापर्यंत वर्चस्व दाखवण्याची गरज नसते. जेव्हा सुरक्षित, ठाम, सर्वव्यापारी, आत्मविश्वासपुर्ण मुळ मजबूत असणारं नेतृत्व समजाला मिळतं तेव्हा खरा उभा राहतो नेतृत्वरुपी सह्याद्री. योग्य नेतृत्व निवडा, माझा जनतेला प्रश्न आहे, तरीही तुतारी वाजणार का? या पोस्टने माजलगाव मतदारसंघात खळबळ उडवून दिली आहे. आ. सोळंकेंनी जयसिंह सोळंकेंचं नाव पुढं केल्यानंतर त्यांच्या धाकट्या सुनबाई पल्लवी सोळंकेंकडून केली गेलेली ही पोस्ट सकारात्मक की नकारात्मक? योग्य नेतृत्व निवडण्याबाबत केलेलं वक्तव्य आणि तरीही तुतारी वाजणार का? हा जनतेला केला गेलेला प्रश्न माजलगाव मतदारसंघासह जिल्ह्यात चर्चेला उधान आणून सोडणारा आहे.