छाप्यात पाच लाखाच्या पिकअपसह साडेतेरा लाख रुपयांचा गुटखा जप्त
बीड (रिपोर्टर) खोट्या कारवाया आणि एफआआर करत कायद्याच्या कशा तिनतेरा वाजवल्या जातात याचं सत्य आणि ज्वलंत चित्रण ‘जयभीम’ चित्रपटातून दाखवून देण्यात आलं. त्या चित्रपटाची रंगीत तालीम सध्या शिवाजीनगर पोलिसांकडून केली जातेय. काल मध्यरात्री पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाटसांगवी या गावात जावून 7 लाकांपेक्षा जास्त रुपयांचा गुटखा शिवाजीनगर पोलिसांनी पकडला. हे अभिनंदनीय मात्र फिर्यादीमध्ये सरळ सरळ खोटी बाब नोंदवण्यात आली. बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर सापळा रचला. वाहन थांबले नाही म्हणून पाठलाग करत शांताईजवळ अडवलं आणि नंतर वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशीअंती अन्य गुटखा हा भाटसांगवी येथे पकडला, अशी नोंद करण्यामागचा शिवाजीनगर पोलिसांचा हेतू काय? खरं तर हा गुटखा थेट भाटसांगवी येथेच पकडला गेला, बीडमध्ये हे नाट्य झालेच नाही. शिवाजीनगर हद्द सोडून ‘जयभीम’ची रंगीत तालीम बीडमध्ये राबवतेय याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधिक्षकांनी घ्यावी.
याबाबत अधिक असे की, काल रात्री शिवाजीनगर पोलीसांना टिप मिळाली. त्या टिपनुसार मध्यरात्रीच्या दरम्यान महिला पोलीस कर्मचार्यांसह केतन राठोड यांची एक टीम भाटसांगवीत जावून पोहचली. आपण तर पिंपळनेर पोलिसांना अॅडजेस्ट करतो मग कोण आलं? या भीतीने गुटखा बाळगणारा चादर नावाचा व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी तिथे शोधाशोध केली तेव्हा सात लाखांपेक्षा जास्त रुपयांचा राजनिवास, आरएमडी, गोवा, हिरा यासह अन्य गुटखा तंबाखु जप्त करून तो गुटखा बोलेरो क्र. एम.एच. 23 ए.यू. 2945 या गाडीत भरून या गाडीसह अन्य गाड्यांमध्ये भरून पोलीस ठाण्यामध्ये आणला. ही कारवाई कौतुकास्पद आहे मात्र फिर्यादीत शिवाजीनगर पोलिसांनी केतन राठोड यांना टिप मिळाली त्यानुसार साडेअकरा च्या दरम्यान बीडमधील राष्ट्रवादी भवनासमोर सापळा रचला. भरधाव वेगात येणारं संशयित वाहन यास इशारा केल्यानंतरही ते थांबलं नाही. भरधाव वेगात ते पुढे गेले, त्याचा पाठलाग करताना शांताई हॉटेलजवळ त्याला पकडण्यात आलं. हा थरार दहा मिनिटांमध्ये झाला. त्याठिकाणी गाडीचालक संतोष निवृत्ती चादर हा पळून जात होता. त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आलं. विश्वासात घेऊन माहिती घेतली असता भाटसांगवी येथे गुटखा असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आम्ही त्याठिकाणी जावून छापा मारला, असे नोंदविण्यात आले. मात्र शिवाजीनगर पोलीस हे डायरेक्ट भाटसांगवीला गेले, तिथे छापा मारला. छाप्यामध्ये काही पैसे सापडले ते पैसे संबंधित व्यक्तीच्या घरातील महिलेजवळ देण्यात आले. त्याचा फोटोही पोलिसांनी काढल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. एकूणच कारवाई चांगली रोखठोक परंतु फिर्यादेत फेरफार करून शिवाजीनगर पोलीस कायद्याची दिशाभूल करतय. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून शिवाजीनगर पोलीस जर अशा पद्धतीने कायद्याचा दुरुपयोग करत असेल, छेडछाड करत असेल तर भविष्यात सर्वसामान्यांसाठी ही धोकादायक बाब आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या कारवाईची सखोल चौकशी करावी. राष्ट्रवादी भवन ते शांताई हॉटेल परिसरातील रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावेत, मग दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी होईल.