बीडची बाजारपेठ गजबजली, पोलीस प्रशासन सतर्क, बाजारपेठेत श्वानपथकाकडूनही तपासणी
बीड (रिपोर्टर): सुखकर्ता तू, दु:खहर्ता तू, विघ्नहर्ताही तू असं म्हणत गणरायाच्या आगमनानिमित्त घराघरात श्रीच्या स्वागताची जय्यत तयारी जिथे तिथे दिसून येत असून ठिकठिकाणच्या बाजारपेठा गणेश भक्तांनी गजबजल्याच्या पहावयास मिळत आहेत. ढोलताशाचा गजर, गुलालाची उधळण करत दारी तोरण अन् आंगणी रांगोळी काढत ज्याने त्याने मोठ्या उत्साहात बाप्पाला आपल्या घरी आणले. अनेक ठिकाणी श्रीची स्थापना मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली. दुसरीकडे सणोत्सवाच्या काळामध्ये अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह सर्वसामान्यांना वेगवेगळ्या सूचना देत प्रशासनाने आज बीडच्या गजबजलेल्या ठिकाणी श्वान पथकामार्फत तपासणी केली तर दुसरीकडे शेतकर्यांनी बाप्पाला हात देत सुखकर्ता ये रे बाबा… शेतातल्या पिकावर आलेले संकट दूर कर अन् दु:खाचं निवारण करत अशी याचना केली.
वर्षभर ज्या गणेशाच्या आगमनाकडे आस लावून बसलेल्या गणेश भक्तांसाठी आजचा दिवस हा आनंदोत्सव आणि जल्लोषाचा गेल्या आठ दहा दिवसांपासून जो तो गणेशाच्या स्थापनेसाठी वेगवेगळ्या तयारीला लागल्याचे पहावयास येत होते. आज प्रत्यक्षात गणेशाचे आगमन घराघरामध्ये झाले. दारावर तोरण आणि अंगणी रांगोळी काढत मोठ्या भक्तीभावाने आज ठिकठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली.
सुखकर्ता तू दुखहर्ता तू आणि विघ्नहर्ताही तू अशी ओवाळणी करत बाप्पाची घरोघरी शास्त्रशुद्ध धार्मिक , आध्यात्मिक पद्धतीने स्थापना करून मनोभावे भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेतले. तर इकडे बाजारपेठा गजबजलेल्या दिसून आल्या. ढोलताशाचा गजर, गुलालाची उधळण, काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत जो तो आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाताना दिसून येत होता. बाजारपेठेत वाढलेली गर्दी पाहता कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून बीड पोलीस सतर्क झाल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला तर गर्दीच्या ठिकाणी श्वानपथकामार्फत तपासणी करण्यात आली. गणेशाचे आगमन हे प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचे असते. बाप्पाच्या स्वागतालाच गणराया सुखकर्ता ये रे बाबा आणि निसर्गाच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकर्यांच्या पिकाला सावर, त्यांच्या दु:खाचं निवारण कर असं अनेकांनी गणरायासमोर साकडं घातलं.