बीड (रिपोर्टर): आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले असून आज बीड शहरात दोन महत्वपूर्ण कार्यक्रम होत असून यामध्ये एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तर दुसरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीचा आहे. दोन्ही कार्यक्रमांची जय्यत तयारी दुपारी एक वाजेपर्यंत झाली होती. कार्यक्रम दुपारनंतर सुरू होणार असल्याने आजच्या घोंगडी बैठकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत घोंगडी बैठकीचे अयोजन करण्यात आले आहे. शहरात प्रत्येक रस्त्यावर भगवे ध्वज पहावयास मिळत असून घोंगडी बैठकीसाठी मतदारसंघातून मराठे उपस्थिती दर्शविण्यासाठी येताना दिसून आले. दुपारी एक वाजेपर्यंत घोंगडी बैठकी ठिकाणी मराठे जमा होताना दिसून येत होते.त्याठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रम सुरू होता. दुपारी अडीच ते तीननंतर प्रत्यक्ष जरांगेंच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात होईल. मनोज जरांगे पाटील या बैठकीत काय बोलतात, कुणाला लक्ष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तर दुसरीकडे आशीर्वाद लॉन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक होत असून सदरच्या बैठकीला बाबा सिद्धीकी, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी एक वाजता सदरची बैठक सुरू झालेली नव्हती. ती दोननंतर सुरू होण्याची शक्यता आहे.