विदर्भासह नांदेड, गडचिरोली, नागपूर, वर्धा आदी भागात शेतकर्यांचे प्रचंड नुकसान; अद्याप पंचनामे नाहीत, शेतकर्यांना मदत कधी मिळणार? अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा -अजित पवार
मुंबई/नांदेड (रिपोर्टर) सत्ताकारणाच्या राजकारणात गेल्या महिनाभरात महाराष्ट्रामध्ये काय होतय, इथला शेतकरी जगला की तरला? याचं काही देणंघेणं राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला आहे की नाही? असा सवाल राज्यातील शेतकरी करत असून एकीकडे ‘काय झाडी, काय हाटेल, काय डोंगर’, या मिजाजात पुढारी वावरत असताना शेतकरी मात्र वार्यावर असून जुलै महिन्यात झालेल्या पावसात विदर्भासह नांदेड, वर्धा, नागपूर, गडचिरोली भागातील ८ लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. अद्याप या शेतकर्यांचे शेतातील पिकांचे पंचनामे झाले नसून मदत केव्हा मिळणार? असा सवाल केला जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा म्हणत, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातला राजकारणी सत्ताकारणाच्या धूंदीत शेतकर्यांना वार्यावर सोडत आहे. काय झाडी, काय हाटेल, काय डोंगर म्हणत शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर आहे. जुलै महिन्यामध्ये विदर्भासह नांदेड, वर्धा, नागपूर, गडचिरोली यासह अन्य जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे ८ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतातील पिके पाण्याखाली गेले. सोयाबीन, कापूस, धान, भाजीपाला उद्ध्वस्त झाला. नांदेड जिल्ह्यात २ लाख ९७ हजार हेक्टर वरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. विदर्भात अडीच लाख हेक्टर पिकांना याचा फटका बसला. अद्याप या शेतातील पिकांचे पंचनामे झाले नाहीत. शेतकर्यांना मदत केव्हा मिळणार? असा सवाल केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करत विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही अजित पवार यांनी केली आहे. सायंकाळी चार वाजता अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र
विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी व पूरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकर्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही पत्र लिहिले असून राज्यात झालेल्या नुकसानीची गंभीरता राज्यशासनाच्या लक्षात आणून दिली आहे.








