बीड (रिपोर्टर): गावातील पोलीस पाटील हा पोलीस व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा समजला जातो. गावखेड्यातील बहुतांशी कामात पोलीस पाटलांची मदत घेतली जाते. असे असताना देखील गेवराईच्या तब्बल 158 गावात पोलीस पाटीलच नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी पोलीस व महसूल प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गावातील सरपंच याप्रमाणेच पोलीस पाटील एक महत्वाचे पद आहे. त्यांच्या खांद्यावर विविध जबाबदारीचे ओझे आहे. महसूल विभागाचा काही कार्यक्रम असला की, पोलीस पाटलास कामाला लावले जाते. याशिवाय गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलिसांना पोलीस पाटलांची आठवण येते. पोलीस पाटलांना देखील वेळेचे बंधन नसल्याने रात्रंदिवस त्यांना आपली जबाबदारी पार पाडावी लागते. दरम्यान गेवराई तालुक्यात एकूण जवळपास 190 महसूली गावे आहेत. शिवाय तीन पोलीस ठाणे असून, यात गेवराई पोलीस कार्यक्षेत्रातील 12 गावात पोलीस पाटील कार्यरत आहे. मात्र 62 गावे पोलीस पाटलाविना आहेत. चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील तीनच गावात पोलीस पाटील आहेत. 45 गावातील पोलीस पाटलांचे पद रिक्त असून तलवाडा पोलीस ठाणेंतर्गत 15 गावात पोलीस पाटील आहेत तर 51 गावे पोलिस पाटलाविना आहेत.
आरक्षण सोडतीला वर्ष लोटले
बीड जिल्ह्यातील गावातील पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत होऊन एक वर्ष झाले तरी प्रशासनाकडून आद्याप पोलीस पाटील भरती करण्यात आलेली नसल्याने पोलीस पाटलांची भरती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पोलिस पाटील यांची प्रशासनाला गाव पातळीवर नेहमीच मदत होत असते शासनाने लवकरात लवकर पोलिस पाटील यांची नेमणूक करावी. जेणेकरून गावात शांतता राखण्याचे काम पोलिस पाटील करतील व प्रशासनास हातभार लाभेल













