
सरकार म्हणतंय कर्ज माफी करणार, बँक म्हणते कर्ज न भरल्यास कायदेशीर कारवाई करू
बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्या
बीड, (रिपोर्टर)ः- महाआघाडी सरकारने निवडणूकीमध्ये शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली हेाती. मात्र या घोषणेची अद्यापर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही. आम्ही माफ करणारच आहोत असे आश्वासन आजही सरकारचे मंत्री देत आहेत. तर दुसरीकडे स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा कृषी विभाग बीडच्या वतीने पिककर्जाची थकबाकीदार यांना नोटीसा बजावल्या आहेत. थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आला. पेरणी तोंडावर असतांना बँकेने अशा पध्दतीने शेतकर्यांना नोटीसी बजावणे योग्य आहे का? अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात आहे असे असतांना बँकेकडून नोटीसा बजावण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होत असतांनाही याची कसलिही खंत बँक प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कृषी विभाग बीडच्या वतीने तालुक्यातील अनेक शेतकर्यांना पिक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यातील काही शेतकर्यांची बाकी थकीत आहे. ही बाकी विविध कारणामुळे थकीत असू शकते. कधी वेळेवर पाऊस पडत नाही तर कधी शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्यांच्या बाक्या थकलेल्या आहेत. विधानसभा निवडणूकीत विद्यमान सरकारमधील नेत्यांनी शेतकर्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली हेाती. मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. आम्ही कर्ज माफी करणार आहोत असे सरकार मधील मंत्री म्हणत आहे. दुसरीकडे मात्र स्टेट बॅक ऑफ इंडिया कृषी शाखा राजीव गांधी चौक येथील बँकेने थकबाकी दार शेतकर्यांना चक्क नोटीसा पाठविल्या आहेत. कर्ज न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा नोटीसीमध्ये देण्यात आला.
खरीपाची पेरणी तोंडावर आलेली आहे असे असतांना बँकांनी अशा पध्दतीने शेतकर्यांना नोटीसा पाठविणे कितपत योग्य आहे. गेल्या 18 दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे. शेतकरी संकटात आहे. पेरणीसाठी पैसे उपलब्ध करण्यासाठी शेतकरी धडपड करत असतांना बँकेने थेट वकिलामार्फत नोटीसा बजावल्याने शेतकर्याता संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दखल घेण्याची मागणी केली जात आहे.






