
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
पोलिसांनी फक्त दोन दिवसांची पोलीस कोठडी का मागितली? याचीही चौकशी होईल
कुणाचा वरदहस्त आहे का? याचीही चौकशी केली जाईल -मुख्यमंत्री
मुंबई (रिपोर्टर): उमाकिरण शैक्षणिक संकुल प्रकरणात जी घटना घडली आहे ती अत्यंत गंभीर असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी महिला आयपीएस अधिकार्याच्या अध्यक्षतेखाली समिती (एसआयटी) गठीत केली जाईल, अशी महत्वपुर्ण घोषणा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते विधानसभेत निवेदन करत असताना बोलत होते. या प्रकरणी आ. तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
विधिमंडळाचे अधिवेशन कालपासून सुरू झाले. आज विधानसभेत आ. तुपे यांनी बीड येथील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीडमध्ये विद्यार्थिनीचे लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. पालकाने हिमतीने तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला. यात पोलिसांनी फक्त दोन दिवसांची पोलीस कोठडी का मागितली? हे संशयास्पद आहे, याची चौकशी केली जाईल. एक मुलगी समोर आली, पण किती मुलींसोबत हा प्रकार झाला याची शक्यता आहे, त्यासाठी आपण निर्णय घेतला आहे. वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकार्यांकडून ही चौकशी केली जाईल. आरोपीला कोणाचा वरदहस्त आहे का? याचीही चौकशी करू, आमच्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने कारवाई करू, कालबद्ध पद्धतीने एसआयटी चौकशी करेल, नराधमांना कठोर शिक्षा मिळेल, त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न केला तर त्यालाही शिक्षा मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

एसआयटी नेमल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार
प्रकरणातील शेवटच्या आरोपीला शिक्षा व्हावी -धनंजय मुंडे
बीड येथील उमाकिरणमधील घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून याची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणात स्थानीक पोलीस गंभीर दिसत नाहीत. पोलिसांनी तीन दिवसांची पीसी मागितली, न्यायालयाने दोन दिवसांची पीसी दिली. हे प्रकरण मॅनेज करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी एसआयटी नेमावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी एसआयटी नेमण्याची घोषणा केली असून त्यांचे मी आभार मानत आहे. या प्रकरणातल्या शेवटच्या आरोपीला शिक्षा व्हावी, अशी आपली मागणी असून मी कधीही कुणावर चुकीचे आरोप केले नसल्याचे आ. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.








