
गेवराईत 21 बोगस कामगारांविरोधात गुन्हे
जिल्ह्यात बोगस कामगार शोधण्यासाठी सात पथके
बीड (रिपोर्टर): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकजण नावनोंदणी करत आहेत. यातच काही जणांनी बोगस नाव नोंदणी करून मंडळाच्या सुविधा लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसात तब्बल 21 जणांवर कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांनी नगर परिषदेचे बोगस सही शिक्के आणि सीओंच्या बोगस सह्या मारल्याचे उघड झाले आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर बोगसगिगरी करणार्यात एकच खळबळ उडाली असून मंडळाची फसवणुक करू पाहणार्यांना उघडे पाडण्यासाठी मंडळाने बीड जिल्ह्यात पाच पथकांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बोगस कामगार नोंदणी करत असल्याच्या तक्रारी मंडळाकडे गेल्यानंतर बीड जिल्ह्यात मंडळाने पाच ते सहा पथकांची नियुक्ती केली. पथकाने तपासणी करण्यास सुरुवात केली असता गेवराई नगर परिषदेमध्ये काहींनी बोगस सह्या आणि बोगस सही शिक्के मारून याचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. पथकाने जेव्हा तपासणी केली तेव्हा नगरपालिकेचे सही शिक्के आणि सीओची सही बोगस असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी नामदेव सटवाजी भिसे (सहाय्यक कामगार आयुक्त) यांचे कार्यालय किनवट यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अनुराधा शिवाजी लिंगसे, सुनिता सुरेश शहाणे, स्वाती जिजाराम घोडके, स्वाती श्याम पारखे यांच्यासह 21 जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे सही शिक्के करून कामगारांची नोंदणी केली. नुतनीकरणाचे व मंडळाची शिष्यवृत्ती, गृहोपयोगी संच, अत्याश्यक व सुरक्षा संच या योजनेचा लाभ घेण्याचा व मंडळाची शासनाची दिशाभूल आणि आर्थिक फसवणूक करण्याकरिता तसेच स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी 90 दिवस कामाचे बनावट प्रमाणपत्र तयार केल्या प्रकरणी गु.र.नं. 115/2025 कलम 318, (4), 338, 336 (3), 340 (2), 341 बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात अन्य ठिकाणीही बोगस कामगारांची नोंदणी झाली आहे का? याची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात येते.









