
केज पोलिसांची गुटख्यावर कारवाई
गुटखा माफिये मोकाट, हप्तेखोरी जोमात म्हणून बीड जिल्ह्यात गुटख्याचा बाजार
केज-कळंब रोडवर कारवाई, धाराशीव, बीडचा गुटखा माफिया एकच
गुन्ह्यामध्ये बीडचे गुटखा माफिया दिसेनात
पोलिसांना माहित आहे गुटखा कुणाचा

केज/नांदूर (रिपोर्टर): महाराष्ट्र शासनाने गुटख्यावर बंदी टाकूनही लपूनछुपून गुटख्याची विक्री होत आहे. काल दुपारी केज पोलिसांनी केज-कळंब रोडवर एका टेम्पोची झाडाझडती घेतली असता या टेम्पोत 74 लाख 52 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. गुटख्यासह टेम्पोची किंमत 1 कोटी 1 लाख 52 हजार रुपये इतकी आहे. हा गुटखा धाराशीव जिल्ह्यातील कळंब येथे जात होता. या प्रकरणी चार आरोपींविरोदात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मुख्य गुटखा माफियावर गुन्हा दाखल झाला नसल्याचे या एफआयआरवरून दिसून येते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा अवैधपणे येतो आणि विक्री होतो त्याचेच हे ज्वलंत उदाहरण. तब्बल 74 लाखांचा गुटका पकडला गेला. गुटखा माफिया कोण, कुठे असतात हे ठराविक पोलिसांना माहित आहे म्हणूनच या कारवाईत प्रमुख गुटखा मापियांवर कारवाई केली नसल्याचे बोलले जाते.
केजहून कळंबकडे जाणारा टेम्पोची (क्र. एम.एच. डी.डी. 01 9442) केज पोलिसांनी झाडाझडती घेतली असता या टेम्पोमध्ये वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी गुटखा आढळून आला. या गुटख्याची एकूण किंमत 74 लाख 52 हजार इतकी आहे. गुटख्यासह टेम्पो 1 कोटी 1 लाख 52 हजार रुपये किंमतीचा आहे. या प्रकरणी केजचे पोलीस उपनिरीक्षक उमेश ज्ञानेश्वर निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी रईसोद्दीन अमिरोद्दीन शेख (वय 50 वर्षे, रा. मिल्लतनगर, अकोला रोड, ता. जि. रतलाम राज्य मध्यप्रदेश), आरोपी क्रमांक 2 परशूराम गायकवाड (ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर) आरोपी क्रमांक 3 जालीमसिंग (रा. बेहरामपूर) नं. 4 रुपेश मालपाणी (रा. कळंब जि. धाराशीव) या चौघा जणांविरोदात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील हा गुटखा धाराशीव जिल्ह्यातील रुपेश मालपाणी याच्याकडे जात होता. सदरील ही कारवाई एपीआय निकम, पो.हवालदार मुंडे, चोपणे, दराडे, कागदे, हणवते, मांजरमे, उनवणे यांनी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.








