मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाचा आज (३१ ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील लाखो मराठा समाजबांधवांनी हजेरी लावली असून राजकीय नेतेदेखील भेट देत आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर भेट देत मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र, भेटीनंतर त्या परत जात असताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीला अडवले. आंदोलकांनी गाडीचा घेराव घालत शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही आंदोलकांकडून पाण्याची बाटली फिरकवण्याचाही प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.
यामुळे मैदानावर काही वेळ मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. अखेर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने सुप्रिया सुळे यांची गाडी मार्गस्थ झाली आणि त्या सुरक्षितपणे रवाना झाल्या.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? “मनोज जरांगे यांनी चार दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही, त्यामुळे त्यांना प्रचंड थकवा आला आहे. त्यांनी विनंती केली आहे की मुंबई महापालिका आयुक्तांनी आंदोलनस्थळी स्वच्छतेची आणि लाईट्सची व्यवस्था करावी. या संदर्भात मी महापालिका आयुक्तांशी बोलणार आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी सांगितलं.
मराठा आरक्षण चळवळीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या या प्रकारामुळे आझाद मैदानावर काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.










