मुंबई : ऑनलाइन रिपोर्टर
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे. “आरक्षण मिळेपर्यंत उठणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतल्यामुळे सरकारवर प्रचंड दबाव वाढताना दिसत आहे. मात्र या मागणीला ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होत असून आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहेत.
मराठा आरक्षणावरून वाढलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची उद्या (1 सप्टेंबर) मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणाचे संभाव्य परिणाम, मराठा समाजाच्या मागण्या आणि ओबीसी समाजाची अधिकृत भूमिका याबाबत सखोल चर्चा होणार आहे.
उद्या ओबीसी नेत्यांची भव्य पत्रकार परिषद या बैठकीनंतर ओबीसी नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या पत्रकार परिषदेतून ओबीसी समाजाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार असून विशेषतः हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट यांचा तसेच हाय कोर्ट व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा संदर्भ देत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उद्याची पत्रकार परिषद राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार असून मंत्री छगन भुजबळ नेमके कोणते मुद्दे पुढे आणतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








