परळी मतदारसंघात पावसाने झालेल्या नुकसानीचा धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा
फुटलेली तलाव, खराब झालेले रस्ते आदींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ पाठवण्याचे निर्देश
धोक्याची पातळी ओलांडलेल्या तलावांच्या बाबत सतर्क राहण्याच्या सूचना
परळी वैद्यनाथ ऑनलाईन रिपोर्टर- परळी वैजनाथ मतदारसंघात 15 जुलै नंतर पावसाचा जोर वाढत गेला, मागच्या काही दिवसात तर पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले असून अनेक ठिकाणी अजूनही शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान होत असून, झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना आज माजी मंत्री, आ. धनंजय मुंडे यांनी स्थानिक प्रशासनास दिल्या आहेत; तसेच याबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा करून संबंधितांना तसे आदेश देण्याचे सुचित केले आहे.

परळी मतदारसंघात मागच्या काही दिवसात अतिवृष्टी व अति पावसाने झालेल्या नुकसानीचा समग्र आढावा आज धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्फत घेण्यात आला. यावेळी श्री मुंडे यांनी मंडळ आणि गाव निहाय झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
पावसामुळे ग्रामीण व शहरी भागात घरांची झालेली पडझड, पशूंची झालेली हानी याबाबत स्वतंत्र पंचनामे करणे तसेच स्थानिक आपत्ती निवारण निधीतून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले असल्यास त्याबाबतचे तात्काळ द्यावयाचे अनुदान याबाबतही धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

परळी मतदारसंघातील लाडझरी येथील तलाव फुटल्याने त्या पुढील तीन गावांमध्ये पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले असून याबाबत स्वतंत्र पंचनामे करण्यात यावेत, तसेच धोक्याची पातळी ओलांडलेल्या लहान-मोठे तलाव धरणांची माहिती प्रसिद्धेश देऊन नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात यावे अशाही सूचना धनंजय मुंडे यांनी दिल्या.
दरम्यान अनेक ठिकाणी पावसामुळे रस्ते वाहून गेले किंवा खचले असून अशा रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम किंवा जिल्हा परिषद अशा संबंधित यंत्रणांना दुरुस्ती करण्यासंबंधीचे प्रस्ताव तातडीने पाठवण्यात यावेत असेही निर्देश यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले.
महावितरण कडील प्रलंबित असलेल्या विविध कामांसह, विविध उपकेंद्रांच्या अंतर्गत पावसाने झालेले नुकसान, बोल किंवा तारा तुटण्याचे प्रकार याबाबत स्थानिक गावातील सरपंच किंवा पदाधिकाऱ्यांनी जरी कळवले तरी त्याबाबतीत तातडीने ॲक्शन घ्यावी जेणेकरून कुठलेही गाव अंधारात राहणार नाही अशाही सूचना धनंजय मुंडे यांनी महावितरणचे अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस युवक नेते तथा माजी जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, ऍड गोविंदराव फड, मार्केट कमीटीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, माऊली तात्या गडदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, प्रा मधुकर आघाव, राजाभाऊ पोळ, माणिक भाऊ फड, पिंटू मुंडे, चंद्रकांत कराड, विष्णुपंत देशमुख यांसह मतदारसंघातील सर्व गट व गणप्रमुख त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे, महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री डाकरे व श्री चाटे, उप अभियंता अभिजित राठोड, परळीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, अंबाजोगाई येथील गटविकास अधिकारी श्रीमती दिवाणे, यांसह महसूल, जिल्हा परिषद, आरोग्य, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम इत्यादी विभागाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.












