मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा निर्णायक टप्पा – उद्यापासून पाणी त्याग!
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तिसऱ्या दिवशी पोहोचले असून, आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यभरातून हजारो मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत, “उद्यापासून पाणी पिणं बंद करणार” असल्याचे स्पष्ट केले. यामुळे आंदोलनाला नवा आणि गंभीर वळण मिळालं आहे.
७० वर्षांपासून न्याय नाही – जरांगे पाटील संतप्त
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “७० वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षणाचं आश्वासन मिळत आलं, पण प्रत्यक्षात न्याय मिळाला नाही. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदना आज असह्य झाल्या आहेत. गरीब लोक मुंबईत येऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यांच्या सेवेसाठी सर्व जातींचे लोक पुढे सरसावले आहेत. हे आंदोलन आता केवळ मराठ्यांचे नाही तर न्यायासाठीची सामूहिक लढाई आहे.”
मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना आवाहन
मुंबईकडे येणाऱ्या आंदोलकांना आवाहन करताना त्यांनी सांगितलं की, “राज्यातील गरीब मराठा जर आझाद मैदानावर पोहोचत असतील, तर त्यांनी गाड्या ग्राउंडवर उभ्या कराव्यात आणि रेल्वेने थेट मैदान गाठावं. तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील, याची काळजी घ्या.”
तसेच भोजन वाटपाबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले की – “तुम्ही जेवण घेऊन आलात, तर पार्किंगवर वाटप करा, नाहीतर येथे उपाशी राहणाऱ्यांची गैरसोय होईल. अन्नछत्र सुरू करणाऱ्यांनी पैशासाठी हात पसरू नका. गरीबांच्या नावाने लूट करणाऱ्यांची नावं मी थेट मीडियात घेईन.”
भ्रष्टाचारावर थेट प्रहार
जरांगे पाटील यांनी कुणाचं नाव न घेता काही नेत्यांवर थेट आरोप केले. “तू लोकसभेतसुद्धा लोकांकडून पैसे घेतलेस, तुझे डिझेल खर्च झाले त्याचा मी हिशोब करतो आणि तुला पैसे देतो. तू रेनकोट वाटले, त्यासाठी कोणाकडून पैसे घेतले, हे महाराष्ट्राला माहित आहे. दादा असशील का पादा, पण मराठ्यांनी आता कुणालाही पैसा द्यायचा नाही.”
आंदोलनाची धग वाढणार
मनोज जरांगे पाटील यांची “उद्यापासून पाणी त्याग” ही घोषणा आंदोलन अधिक तीव्र करणार आहे. आधीच राज्यभरातून आलेल्या आंदोलनकर्त्यांनी आझाद मैदान भरून गेले असून, आता सरकारसमोर कठीण प्रश्न उभा राहिला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर ठोस निर्णय न घेणाऱ्या सरकारविरोधात राग व्यक्त करत जरांगे पाटील म्हणाले, “गरिबांचं रक्त पिऊ नका, हा लढा सत्यासाठी आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.”







