
आझाद मैदानातून हाकललं तर गरीब मराठ्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल -जरांगेंचा सरकारला इशारा
मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर, मराठ्यांच्या गाड्या हटवल्या, सीएसएमटी स्थानकातून आंदोलकांना बाहेर काढले
बीड जिल्ह्यात आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यास सुरुवात
आझाद मैदान रिकामे करण्याची पोलिसांकडून जरांगेंना नोटीस
मुंबई (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस. काल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई रिकामी करण्याचा आदेश दिल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत नियमांचे पालन करून आमचे आंदोलन शांततेत सुरु राहणार असल्याचे म्हटले. सरकारने आमच्या विरोधात न्यायालयात जावून त्या ठिकाणी चुकीची माहिती देत अन्याय करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपुर्वक मराठ्यांना त्रास देत आहेत. मी मेलो तरी हे आंदोलन सुरुच राहणार. मराठ्यांवर बळाचा वापर करू नका, त्याचे भविष्यात गंभीर पडसाद उमटतील, असा इशारा देत सरकारच्या अडवणुकीवर जरांगे पाटलांनी थेट हल्ला करत ही मराठ्याची औलाद आहे, मागे हटणार नाही, मराठ्यांच्या न्याय-हक्कासाठी जीव असेपर्यंत लढणार, असे स्पष्टपणे सांगून टाकले. दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आझाद मैदानावर पाच हजारच लोक असून ट्रॅफिक व्यवस्थीत व्हावी यासाठी वाहने इतरत्र हलवली जात आहेत, तर पोलिसांनी आझाद मैदानावर जात मनोज जरांगे पाटील यांना मैदान सोडण्याची नोटीस दिली आहे. इकडे सरकारही बैठकांवर बैठका घेत असून बीड जिल्ह्यात गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु कररण्यात आली आहे.
आझाद मैदान सोडण्याची जरांगे पडताना पोलिसांची नोटीस
गेल्या चार दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन गुंडाळण्यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, ही नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे आज (2 सप्टेंबर) दुपारी काही पोलीस अधिकारी स्वत: ही नोटीस घेऊन आझाद मैदानात आले. ही नोटीस प्रथम मराठा समाजाच्या वकिलांना दाखवण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी व्यासपीठावर गेले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना झोपेतून जागे करत ही नोटीस त्यांच्या हातात ठेवली. त्यामुळे आता मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बीड जिल्ह्यात गुन्हे मागे घेण्यास सुरुवात
बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. ज्या आंदोलनामध्ये पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. त्या गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेतली जाणार आहेत. बीड जिल्ह्यात या गुन्ह्यांबाबत आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सर्व उपविभागीय दंडाधिकार्यांना दिले आहेत.
सुमारे 400 प्रकरण अद्याप तपासायची बाकी, 20 दिवसात अहवाल सादर करण्याचा निर्णय
गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल झालेली सुमारे 400 प्रकरण अद्याप तपासायची बाकी आहे. ही सर्व प्रकरणे पुढील 20 दिवसात तपासून तातडीने अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे निर्देश दिले आहेत. सर्व प्रलंबित प्रकरणांची तपासणी आठ दिवसात पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देश याबाबत आहेत. या निर्णयामुळे मराठा आंदोलकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या आहेत अटी व शर्ती
20 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार कोणत्याही आंदोलनादरम्यान जीवितहानी झालेली नसावी. सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान असल्यास अर्जदाराच्या अर्जाची वाट न पाहता समितीने स्वतःहून तपासणी करावी.. नुकसान भरपाई भरण्याची लेखी संमती दिल्यास खटला मागे घेण्याची शिफारस केली जाईल. मात्र नुकसान भरपाई भरली म्हणजे गुन्हा मान्य झाला असा त्याचा अर्थ नाही.
’…तोपर्यंत मुंबई सोडणार नाही’, नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
नियमांचं पालन करून आमचं आंदोलन शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी सुरूच राहणार. सरकारने आमच्याविरोधात न्यायालयात जाऊन अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तरी सरकारला सांगतो आणि फडणवीसांनाही सांगतो. सगळ्या मागण्यांची (हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर) अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस दिली. त्यानंतर ते बोलत होते.
आझाद मैदाना मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून, आज पाचवा दिवस आहे. मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर त्यांनी मैदान न सोडण्याची भूमिका मांडली.
आम्ही रस्त्यावरील गाड्या हटवल्या
जरांगे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही आंदोलन करतोय. रात्री न्यायालयाच्या एका विषयावर आम्ही सांगितलं की, रोडवरील सर्व गाड्या काढा आणि मैदानात लावा. चार-पाच तासांत एकही गाडी रस्त्यावर ठेवली नाही. न्यायदेवतेच्या एका शब्दावर आम्ही जिथे ट्रॅफिक नाही, अशा ठिकाणी लावल्या आहेत, असे जरांगे यांनी सांगितले.
सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होणेही गरजेचे आहे. त्याला काय अडचणी आहेत, त्या आम्हाला सांगा. मराठा-कुणबी एक आहेत, यात काय अडचणी आहेत; तेही आम्हाला सांगा. सरसकट राज्यातील केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणार्या पोलिसांना बडतर्फ करून गुन्हे दाखल करा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही -जरांगे
बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या नोंदी चिटकवून जागेवरच कुणबी प्रमाणपत्र वाटप करणे आवश्यक आहे. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले, त्यांची वैधता तातडीने द्या. त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
शिंदे समितीला मुदतवाढ दिलीये, तर समितीने नोंदी शोधणं सुरूच ठेवलं पाहिजे. देवस्थानांचे दस्ताऐवज शोधले गेले नाहीत, तेही शिंदे समितीने शोधावेत. गोषवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातील नोंदी शोधणंही गरजेचं आहे. त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहेत. शिंदे समितीला तिचं स्वतंत्र कार्यालय असणं आवश्यक आहे, तेही दिलं जावं, असेही जरांग यावेळी म्हणाले.
तुम्ही, सरकारने कितीही आम्हाला भिती दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही भीत नसतो. आमची मराठ्यांची औलाद आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही शांत आहोत; आम्हाला शांत राहू द्या. जे-जे बोलतो, ते-ते होतं असतं माझं. मराठे आणखी यायला सुरू झालेले नाहीत. शनिवारी, रविवार जर मराठे मुंबईला आले, तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. त्यामुळे ती मराठ्यांवर येऊ देऊ नका, असे मनोज जरांगे म्हणाले.
ते तुमच्यासाठी घातक ठरेल; जरांगे फडणवीसांना काय म्हणाले?
आम्ही मुंबई सोडत नसतो. सोडणार नाही. आम्ही ठाम आहोत. तुम्ही काय कराल, शंभर पोलीस आले, तरी तुरुंगात नेतील. एक लाख फौजफाटा आला, तरी तुरुंगातच नेतील. आम्ही तुरुंगात उपोषण करू. पण, सुट्टी देणार नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल, असं वागू नका. मराठ्यांना इथून काढून देणं ही काळजात रुतणारी सल आहे. फडणवीस साहेब, ती रुतू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानातून हुसकावून द्याल. तो जिव्हारी झालेला वार तुम्हाला महागात पडेल, असा इशाराही जरांगेंनी दिला.






