
दीपक केदार यांनी घेतली ढाका कुटुंबियाची भेट
बीड (रिपोर्टर)- बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी रात्री 22 वर्षीय यश देवेंद्र ढाका या वाल्मिकी समाजाच्या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा हा मुलगा असून, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा यश मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत किरकोळ वादातून या भयानक घटनेचा शिकार झाला. कुटुंबाने हा सुनियोजित कट असल्याचे सांगितले असून, सात ते आठ आरोपी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेने या हत्येला जाहीर निषेध करत कठोर तपास, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.

यशच्या हत्येनंतर रविवारी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. कुटुंबीयांनी दीपक भाईंना घटनेची माहिती देताना, हा सुनियोजित कट होता. यात अनेक आरोपींचा समावेश आहे. सर्वांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.
यशच्या वडिलांनी सांगितले की, मुलाची हत्या किरकोळ वादाच्या नावाखाली केली असली तरी मागे लपलेल्या षड्यंत्राचा तपास व्हायला हवा. कुटुंब सध्या भीतीच्या सावटाखाली असून, पोलिसांनी तात्काळ संरक्षण द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.
या प्रकरणात आयपीसी कलम 120बी (गुन्ह्याची सायन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी प्राथमिक तपासात एका आरोपीला अटक केली आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानी वरून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते व बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सांगितले, बीडमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. पोलिसांची कायद्याची भीती उरणार नाही, अशी स्थिती आहे. शहरात शस्त्र पुरवठा कुठून होतोय? बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीशी याचा संबंध आहे का? अशा अनेक अँगलने सखोल तपास व्हावा. बीड पोलिस अधीक्षकांनी राजकीय दबावाला बळी न पडता सर्व आरोपींना अटक करावी. वाल्मिकी समाजाच्या नेते व छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष करण भाई कलियाना म्हणाले, वाल्मिकी समाजावर सतत हल्ले होत आहेत. आठ दिवसांपूर्वी लासलगाव येथे एका वाल्मिकी तरुणाची अशीच हत्या झाली. ही साखळी थांबवण्यासाठी गृहमंत्र्यांनी गांभीर्याने हा मुद्दा घ्यावा.
पँथर सेनेच्या या भेटीत अनिल उजगरे, सुंदर वाघमारे, समाधान बचुटे, वसीम शेख, अमोल गढवे, अविनाश वडमारे, पप्पू आरे, राजेश वडमारे, बाबा कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सेनेने सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई, सीआयडी-एसआयटीमार्फत चौकशी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी केली आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा चालू राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या घटनेमुळे बीड शहरात खळबळ उडाली असून, वाल्मिकी समाजातून रोष व्यक्त होत आहे. शुक्रवारी शोकाकुल वातावरणात यशचे अंत्यसंस्कार झाले. पोलिसांनी तपास वेगवान केल्यासच या प्रकरणाचा खरा चेहरा उघड होईल, असा विश्वास आहे.







