
चालकाच्या पित्यावरही केला हल्ला, दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल

परळी, (रिपोर्टर)ः- शाळेमधून गुरूकुलकडे येणार्या विद्यार्थ्यांना रस्त्यामध्ये अडवत परिक्षेत पेपर का बघू दिला नाही असे म्हणून दोघा जणांनी 11 विद्यार्थ्यांना बेल्ट, बुटाने जबर मारहाण करत जखमी केले. ही घटना शहरातील सिध्देश्वर नगर भागातील नर्मदेश्वर गुरूकुलात काल दुपारी घडली. विद्यार्थ्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर पुन्हा गुरूकुल चालकाच्या पित्यालाही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघा जणांविरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

परळीच्या सिध्देश्वर नगर मध्ये अर्जुन महाराज शिंदे यांचे तीन वर्षापासून श्री नर्मदेश्वर गुरूकुल आहे. या गुरूकुलात 42 विद्यार्थी भजन, किर्तन, मृदंगाचे शिक्षण घेवून कृष्णा नगर व गणेश पार रोडवरील शाळेमध्येही ते शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी या विद्यार्थ्यांची शाळेत परिक्षा होती. परिक्षा देवून विद्यार्थी गुरूकुलाकडे जात असतांना त्यांना दिनेश माने व बाळू एकीळवाले या दोघाजणांनी अडवून तुम्ही परिक्षेत पेपर का पाहू दिला नाही असे कारण पुढे करत विद्यार्थ्यांना मारहाण केली. या मध्ये रोहन, कृष्णा, प्रणव, वैभव, वरद सह 11विद्यार्थी जखमी झाले. घडलेला प्रकार विद्यार्थ्यांनी अर्जुन महाराज शिंदे यांच्या भावजईंना सांगितला. त्यांनी मग शिंदे यांना दुरध्वनीकरून घटनेची माहिती दिली. शिंदे गुरूकुलात आल्यानंतर त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले. मुलांना रूग्णालयात घेवून गेल्यानंतर महाराजांचे वडील बाबासाहेब शिंदे यांना देखिल मारहाण करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी अर्जुन शिंदे यांच्या फिर्यादीवरून दिनेश माने व बाळू एकीळवाले या दोघांविरोधात परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









