
डॉ. संपदा मुंडे प्रकरण ; वडवणी शहरासह तालुका कडकडीत बंद ठेवून सर्वपक्षीयाचा भव्य रस्ता रोको
वडवणी, (रिपोर्टर)ः- कर्तव्यावर असताना रुग्णा बाबत अनधिकृत रिपोर्ट देत नसल्या कारणाने काही राजकिय व प्रशासनातील गिधाड गँंगने मेडिकल ऑफिसर डॉ. संपदा श्रीकिसन मुंडे यांना जाणीव पूर्वक त्रास देत त्यांनी आत्महत्या केलेली नसून त्यांचा खून करण्यात आला आहे. असा आरोप करत डॉ. मुंडे यांना न्याय मिळावा. आरोपींचा तपास करून त्यांना फासावर लटकावे यासह अन्य मागणीसाठी आज वडवणी शहरासह तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर शहरातील चाटे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत निषेध महारॅली काढत यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकार विरोधात घोषणा देत मुख्य चौकात भव्य असा सर्वपक्षीय रस्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात डॉक्टर संपादा मुंडे यांच्या आईसह कुटुंब उपस्थित होते.
ही प्रशासन व्यवस्था काहीकांची रखेल झाली ! मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने आणि नेत्यांची रंगीन झालेली आहे..

. या वाक्य प्रमाणे वडवणी तालुक्यातील लेक डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे बनाव केला जात आहे. तिची आत्महत्या नसून खून करण्यात आला आहे असा आरोप होत आहे. या प्रकरणात डॉ. संपदा मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे. हा खटला फलटण कोर्टातून बीड न्यायालयाकडे ट्रान्सफर करावा. या प्रकरणाचा तपासाठी एसआयटीची स्थापना करून तपास अधिकारी प्रमुख म्हणून महिला नोडेल अधिकार्यांची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये सातारा पोलीस प्रशासनातील अधिकारी घेऊ नये. यातील जे दोषी आहेत त्यांना देखील अटक करण्यात यावी. तसेच या प्रकरणातील माजी खासदार यांना देखील शासन करावे यासह 15 अन्य मागण्यासाठी आज वडवणी शहर सह तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला. याला शंभर टक्के व्यापार्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. तर वडवणी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने शहरातील चिंचवन रोडवरील चाटे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत निषेध महारॅली काढण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देण्यात आला. अमर रहे… अमर रहे…डॉक्टर संपदा मुंडे अमर रहे… न्याय द्या….डॉक्टर संपदा मुंडे व कुटुंबीयांना न्याय द्या… या प्रमुख घोषणेने वडवणी शहर दुमदुमून गेले होते. या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांनी देखील हजारोंची संख्येने उपस्थिती दर्शवली होती. हा रस्ता रोको जवळपास दोन तास चालवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तर अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखील पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आईच्या नयनी अश्रू
डॉ. संपदा मुंडे यांच्या मातोश्रीसह कुटुंब या आंदोलनात सहभागी झाले होते. या कुटुंबाने चाटे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पायी चालत घटनेचा निषेध दर्शविला. तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आई ज्यावेळेस आंदोलनात चालत होत्या, त्यावेळेस आईच्या नयनी अश्रूचे बांध फुटत होते हे दृश्य पाहून देखील सर्वसामान्य माणसांचे मन पिळून गेले होते.









