मुंबई (रिपोर्टर): बीड जिल्ह्याच्या डॉक्टर लेकीने फलटणमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणी तिला न्याय मिळवून देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज मुंबईच्या गिरगाव येथे युवक काँग्रेसने आक्रमक होत रस्ता रोखून धरला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानाकडे कूच करत घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णत: विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून भाजपाच्या नेत्यांना वाचवत असल्याचे त्यांनी म्हटले.
बीड जिल्ह्यातल्या कवडगाव येतील डॉ. संपदा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी फलटण येथे सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली. या आत्महत्येने उभा महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणी संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी आज युवक काँग्रेस आक्रमक होत मुंबईच्या रस्त्यावर उतरली. गिरगाव चौपाटी परिसरात रस्त्यावर उतरून त्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. रस्ता अडवून धरला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. भाजपाचे सरकार जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे. स्वत:च्या पक्षातल्या नेत्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. सरकारविरोधात घोषणाबाजी करत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानाकडे निघाले. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत हे आंदोलन गिरगावच्या रस्त्यावर सुरू होते.











