बीड | रिपोर्टर
दि. २५ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रधारकांविरुद्ध बीड जिल्हा पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने गावठी पिस्तूल बाळगणारा एक इसम पकडत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. शिवाजी बंटेवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विशाल मरकस मस्के (रा. सौताडा) हा गावातील एका हॉटेलसमोर कंबरेला गावठी पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या कोणाची तरी वाट पाहत उभा आहे. माहितीची खात्री करून तातडीने पथक रवाना करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठिकाणी पोहोचताच सापळा रचून विशाल मस्के याला अटक करण्यात आली. त्याची अंगझडती घेताना पँटच्या आत कंबरेला लपवलेली गावठी पिस्तूल आढळून आली. पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले असून आरोपीवर पोलिस ठाणे पाटोदा येथे गु. र. नं. 383/2025, कलम 3/25 आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनित कावंत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, आणि प्रभारी अधिकारी श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल, पोलीस हवालदार बाळू सानप, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आनंद मस्के, विकी सुरवसे, तसेच चालक पोलीस अंमलदार सिद्धेश्वर मांजरे यांनी सहभाग घेतला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सतर्कता वाढली असून, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.












