बीड (रिपोर्टर): महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बीड नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतरही उपाध्यक्ष कोणाचा? हे टेन्शन कायम असून अध्यक्षपदासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला असला तरी एकहाती सत्तेसाठी एकहाती सत्तेसाठी एकतृतियांश नगरसेवकांची गरज असते, तेवढे अधिकृत बलाबल कुठल्याच पक्षाकडे नसल्याने आता अजितदादांची राष्ट्रवादी भाजपाची मदत घेते की, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. येत्या दोन दिवसात अध्यक्ष कोणाचा? कोण कोणाची मदत घेणार? हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
बीड नगरपालिकेसाठी अजितदादांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी या तिघांनी आक्रमकपणे निवडूक लढविली. शरद पवारांच्या गटाकडून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, अजितदादांकडून आ. विजयसिंह पंडित आणि भाजपाकडून डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले, क्षीरसागरांना हद्दपार करण्याच्या वल्गना झाल्या, बाहेरचं पार्सल बाहेर पाठवा, अशा टिका-टिपणी झाल्या अखेर निवडणुकीच्या निकालात अत्यंत चुरस राहिली. पहिल्या नऊ फेर्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दहा हजाराच्या लिडने आघाडीवर राहिला, मात्र शेवटच्या चार फेर्यात ती दहा हजाराची लिड तोडत अजितदादांच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी 3 हजारापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. मात्र खाली 26 प्रभागात 52 नगरसेवकांसाठी झालेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कुठल्याही पक्षाला बीडकरांनी दिले नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 19, भाजपाचे 15, शरद पवार राष्ट्रवादीचे 12, शिवसेना-शिंदे गट 3, एमआयएम, काँग्रेस, ठाकरे सेना प्रत्येकी एक नगरसेवक या निवडणुकीत निवडून आले. त्यामुळे उपाध्यक्ष करण्यासाठी कुणाकडेच बहुमत नाही. अशा वेळी अजितदादा संपूर्ण सत्ता एकहाती आणण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करतात की, भाजपाला हे येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल. आ. विजयसिंह पंडित यांनी कालच्या पत्रकार परिषदेत दोन्ही क्षीरसागरांवर आक्रमकपणे टीका-टिपणी केली. त्याचबरोबर येणार्या तीन दिवसात उपाध्यक्ष बाबत निर्णय होईल, असेही त्यांनी म्हटले होते.









