गहिनीनाथ गडावरून धनंजय मुंडे आपला पुढील कार्यक्रम रद्द करून फडणवीसांसोबत सोलापूरला रवाना…
पाटोदा – ऑनलाईन रिपोर्टर
माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे आज श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथील कार्यक्रम संपल्यानंतर आपला पुढील कार्यक्रम रद्द करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून सोलापूरला रवाना झाले, मुंडे यांनी अचानक दौऱ्यात बदल करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये गेल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे!
धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजकीय वाटचालीबाबत राज्यभरात चर्चा सुरू झाली होती.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात देखील धनंजय मुंडे यांचा धनु भाऊ, माझे मित्र, युवा नेते, असा उल्लेख करत गहिनीनाथ गडाच्या विकासासह जिल्ह्याच्या विकासाच्या मार्गात देखील पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे महत्व अधोरेखित केले.
दरम्यान मागील आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता बीड ते छत्रपती संभाजी नगर प्रवासात हेलिकॉप्टर मध्ये बसून त्यांनी आपल्या सोबत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांना सोबत नेले होते. त्यावेळी देखील विविध चर्चांना उधान आले होते,त्या पार्श्वभूमीवर आजच्या प्रवासाने ही लक्ष वेधले आहे.
नुकतीच अमित शहांची झालेली भेट व त्यानंतर आजी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची हवाई सफर, त्यामुळे एकूणच राजकीय चर्चांना उधाण आले असून धनंजय मुंडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.









