————–
गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. पदमाबाई शामराव कर्हे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर बहुमताने मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे खळेगावच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सौ. कर्हे या जनतेतून थेट सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य व एक सरपंच असा कारभार होता. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ग्रामसभा व मासिक बैठका नियमित न घेणे, सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जाणे, तसेच आर्थिक व्यवहारांबाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे आरोप करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर उपसरपंच सचिन आहेर व काही सदस्यांनी तहसील कार्यालय, गेवराई येथे सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. तहसीलदार संदीप खोमणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आठ विरुद्ध दोन अशा मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
सरपंच पद हे जनतेतून निवडून आलेले असल्यामुळे पुढील प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पार पडली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांच्या अध्यक्षतेखाली दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामसभा बोलावण्यात आली. ग्रामसभेत काही नागरिकांनी गुप्त मतदान पद्धतीने निर्णय घेण्याची मागणी केली. त्यानुसार सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान घेण्यात आले.
मतमोजणीअंती अविश्वास ठरावाच्या बाजूने 402 मते, विरोधात 82 मते पडली, तर 7 मते बाद ठरली. अशा प्रकारे 320 मतांच्या स्पष्ट फरकाने अविश्वास ठराव मंजूर झाला. परिणामी सौ. पदमाबाई शामराव कर्हे यांचे सरपंचपदाचे अधिकार रद्द झाले असून पुढील कार्यभार उपसरपंचांकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रक्रियेमुळे गावातील राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील नेतृत्वाबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत व पारदर्शक पद्धतीने व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.












